CoronaVirus News: लस उत्पादन वाढविण्यासाठी मंत्रीसमूहाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 06:25 AM2021-04-10T06:25:00+5:302021-04-10T06:25:19+5:30
८४ देशांना केली निर्यात : केंद्राकडून राज्यांना वेळेवर पुरवठा होत असल्याचा दावा
- एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोनावरील उपाययोजनांबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ग्रुप ऑफ मिनिस्टरची २४ वी बैठक घेतली. लसनिर्मिती, वितरण आदींवर त्यांनी चर्चा केली. लसच्या तुटवड्याबाबत राज्यांकडून तक्रार करण्यात येत असताना ते म्हणाले की, केंद्राकडून वेळेवर लस पोहोचविण्यात येत
आहे.
या बैठकीला परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, शहरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चोबे यांचीही उपस्थिती होती. हर्षवर्धन म्हणाले की, आतापर्यंत देशात १,६७,६४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. गत २४ तासांत ७८० मृत्यू झाले आहेत. मृत्यूदर सध्या १.२८ आहे.
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी लस उत्पादनाची स्थिती, उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न यांची माहिती दिली. हर्षवर्धन म्हणाले की, शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत देशात ९,४३,३४,२६२ लोकांना लस देण्यात आली आहे.
गत २४ तासांत ३६,९१,५११ लोकांना डोस देण्यात आले आहेत. गत आठवड्यात एकाच दिवसात ४३ लाख डोस देण्यात आले होते. सर्वाधिक लसी देण्याचा हा जागतिक विक्रम आहे. आतापर्यंत ८४ देशांना लसीचे ६.४५ कोटी डोस देण्यात आले आहेत.
सध्या देशात ०.४६ टक्का सक्रिय रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. २.३१ टक्के रुग्ण आयसीयूत आहेत. ४.५१ टक्के ऑक्सिजन सपोर्ट बेडवर आहेत.
कोरोना लसीऐवजी दिली अँटिरेबीज इंजेक्शन्स
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : तीन महिलांना शामली जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात कोविड - १९ वरील लसीऐवजी अँटी रेबीजचे इंजेक्शन्स दिले गेले, असा दावा या महिलांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी केला. सरोज (७०), अनाकरकली (७२) आणि सत्यवती (६०) या गुरुवारी कंधला येथे सरकारी रुग्णालयात कोरोनावरील लस घेण्यासाठी गेल्या होत्या.
मात्रा दिल्यानंतर त्यांना अँटी रेबीज लसीची स्लिप्स दिली गेली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तेथेच निषेध केला. चूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी झाल्यानंतर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका दिवसात विक्रमी १,३१,९६८ रुग्ण
नवी दिल्ली : भारतात एका दिवसात शुक्रवारी विक्रमी एक लाख ३१ हजार ९६८ कोरोना रुग्ण नोंद झाले. यामुळे एकूण रुग्णांची संख्या १,३०,६०,५४२ झाली, तर ७८० जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या १,६७,६४२ झाली.
१८ ऑक्टोबरनंतर एका दिवसात प्रथमच ७८० जणांचा मृत्यू झाला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
सलग ३०व्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ झालेली आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९ लाख ७९ हजार ६०८ झाली आहे.
एकूण बाधितांच्या संख्येत ही संख्या ७.५ टक्के असून ही आकडेवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी खाली येऊन ९१.२२ टक्क्यांवर आले.