CoronaVirus News : हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 08:21 AM2020-05-28T08:21:29+5:302020-05-28T08:22:55+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरली जाणारी औषधे ही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामियाच्या सेंटर फॉर इंटर-डिसिप्लिन रिसर्च इन बेसिक सायन्सेस (सीआयआरबीएससी) येथील वैज्ञानिकांना कोरोना (कोविड -19) विषाणूवरील औषधाचे संशोधन करण्यात यश आले आले. या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरली जाणारी औषधे ही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
ग्लॅकाप्रिविर आणि मारव्हियोक ही दोन्ही औषधे कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी प्रभावी आहेत. मात्र, याची पहिल्यांदा क्लिनिकल चाचणी घेतली पाहिजे. जामियाच्या या संशोधनाला प्रतिष्ठित जर्नल बायो सायन्स रिपोर्टनेही मान्यता दिली आहे. सीआयआरबीएससीच्या संशोधन टीमचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. इम्तियाज हसन यांच्या मते, प्रयोगशाळेत कोरोनाच्या मुख्य प्रोटीनच्या क्रिस्टल संरचनेच्या सहाय्याने औषधांना संभाव्य उपचारात्मक पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या संशोधनात ग्लॅकाप्रिविर आणि मारव्हियोक कोरोनाच्या मुख्य प्रोटीनचे सर्वोत्तम अवरोधक म्हणून ओळखले गेले आहेत. याचा वापर कोरोनावर पर्यायी उपचार म्हणून केला जाऊ शकतो. ग्लॅकाप्रिविर हे अँटी-व्हायरल औषध आहे. ज्याचा उपयोग हेपेटायटीस सी विषाणू संक्रमित रूग्णांच्या उपचारांसाठी केला जातो. तर एचआयव्ही संसर्गापासून बचाव करण्यासाठी मारव्हियोकचा वापर केला जातो.
3 डीमध्ये ड्रग रिपोजिंग केले...
डॉ. हसन यांच्या म्हणण्यानुसार, "ग्लॅकाप्रिविर आणि मारव्हियोक या औषधांनी कोरोनाविरूद्ध प्रभावी आणि सुरक्षित औषधे विकसित करण्यासाठी पर्यायी दृष्टीकोन दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्याची औषधे वापरुन प्रभावी उपचार शोधण्याची गरज आहे. या प्रक्रियेस ड्रग रिपोजिंग असे म्हणतात. यामध्ये कम्प्युटरच्या मदतीने ड्रग डिझाइन तंत्राचा वापर करणे, मुख्य संसर्ग प्रोटीनच्या विस्तृत थ्रीडी संरचनांचा अभ्यास केल्यानंतर ड्रग रिपोजिंगद्वारे प्रभावी औषधे ओळखली जातात."