CoronaVirus News : लस तयार होण्यासाठी नेमका किती लागतो कालावधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 03:27 PM2020-08-06T15:27:02+5:302020-08-06T18:46:02+5:30

कोरोना लसीबाबतचे दावे अन् कालावधीचा इतिहास काय सांगतो?

CoronaVirus News: How long does it take to develop a vaccine? what about history | CoronaVirus News : लस तयार होण्यासाठी नेमका किती लागतो कालावधी?

CoronaVirus News : लस तयार होण्यासाठी नेमका किती लागतो कालावधी?

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत अनेक रोगांवर लस तयार करण्यात आल्या. मात्र, त्या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी सुद्धा अनेक वर्षांचा कालावधी लागला आहे.

कोरोनाची लस येणार कधी, याच्याविषयी वेगवेगळे दावे, निरनिराळ्या संस्था आणि देशांकडून केले जात आहेत. पण, प्रत्यक्षात एखादी लस तयार करणे आणि ती बाजारात उपलब्ध करणे, यासाठी नेमका किती कालावधी लागतो. याविषयी फारशे कोणी जास्त बोलत नाही. 'पी हळद आणि हो गोरी' या पद्धतीने आज प्रयत्न सुरु केले म्हणून उद्या बाजारात लस आली असे होत नाही. इतिहास त्याला साक्ष आहे. त्यामुळे कोरोनाची लस किती पटकन बाजारात येऊ शकेल किंवा उपलब्ध होऊ शकेल, याविषयी साशंकता आहे. यासंदर्भातील इतिहास पाहिला, तर याचा उलघडा होतो. 

अनेक देश कोरोनाविरोधी लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये काही चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. रशियाने तर दावा केला आहे की, त्यांनी कोरोनावरील लस तयार केली असून सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात देशातील नागरिकांसाठी या लसीसाठी अभियान सुरु करण्यात येईल. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणूचे कोणतेही अचूक व निश्चित उपचार उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

गेल्या महिन्यात, ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली कोरोनावरील लस ट्रायलमध्ये यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. ही लस रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करत असल्याचे म्हटले आहे. भारतात या लसीच्या दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचण्यांनाही मान्यता देण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अ‍ॅस्ट्रॅजेनेका कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. या लसीसंदर्भात असा दावा केला गेला आहे की, जर सर्व चाचण्या यशस्वी झाल्या तर वर्षाच्या शेवटी ही लस बाजारात उपलब्ध होईल. 

एकंदरीत पाहता कोरोनावरील लस लवकर विकसित झाली तर आनंदच आहे. मात्र, आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर कोरोना सारख्या गंभीर आजारावर लस तयार करण्याची प्रक्रिया साधारणता मोठी असते, त्यासाठी अनेक दशके लागू शकतात. यामध्ये अनिश्चितता आणि प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता देखील असते. एचआयव्ही (HIV) लस तयार करण्यासाठी तीन दशकांहून अधिक काळ काम सुरू आहे. मात्र, हे अद्याप क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. यापेक्षा लवकर तयार करण्यात आलेल्या या लसीलाही बरीच वर्षे लागली आहेत.

उदाहरणार्थ, गालगुंड (Mumps) आजारावरील लस ही जगातील सर्वात वेगवान विकसित लसींपैकी एक मानली जाते. १९६० च्या शतकात चार वर्षांच्या क्लिनिकल ट्रायलनंतर या लसीला मंजुरी मिळाली होती. तर १९५५ साली जॉन्स साल्क या अमेरिकन शास्त्रज्ञाने सात वर्षाच्या अथक प्रयत्नाने पोलिओवर लस शोधून काढली होती. याशिवाय, कॅन्सर सारख्या आजारांवर तर लस तयार करणारे संशोधन अजून पाहिजे तेवढे वेगाने सुरु नाही, त्यामुळे नजीकच्या भविष्यात कॅन्सरवर लस तयार होईल याचा विचारसुद्धा कोणी करू शकत नाही. 

आतापर्यंत अनेक रोगांवर लस तयार करण्यात आल्या. मात्र, त्या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी सुद्धा अनेक वर्षांचा कालावधी लागला आहे. म्हणजेच, देवीरोगाची लस १७९९ साली बनली. त्यानंतर तब्बल १८१ वर्षांनंतर त्याचे उच्चाटन झाले. तर पोलिओची लस १९५५ मध्ये तयार झाली. त्यानंतर जगभरात लसीसाठी योजना राबविली. मात्र, ५० हून अधिक वर्षानंतर जगभरात  पोलिओ आटोक्यात आला. टीबीची लस १९२१ साली निर्माण झाली. आज ९९ वर्षे होऊनही त्याचे उच्चाटन झालेले नाही. भारतात आजही टीबीने मृत्यू झाल्याचे पाहायला मिळते.

 

दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इंफेक्शियस डिसिसीजचे संचालक अँटनी फॉकी (Antony Fauci) यांनी अमेरिकेच्या सिनेटला दिलेल्या निवेदनात, पुढील एक ते दीड वर्षात कोरोनावरील लस विकसित करण्याच्या व्यवस्थेबाबत असमर्थता दर्शविली होती. तसेच, आपत्कालीन मंजुरी रेग्युलेटर उपलब्ध करून दिल्यानंतर दीड वर्षाचा कालावधीही व्यवस्थापित केला जाऊ शकतो, असेही  त्यांनी  म्हटले होते. लस तयार करण्यासंदर्भात अनेक टप्पे आहेत. जे संशोधन आणि विकासापासून सुरू झाल्यानंतर अंतिम वितरण म्हणजेच बाजारात पोहोचण्यापर्यंत असतात. तर ते टप्पे असे आहेत....

पहिला टप्पा : रिसर्च अँड डेव्हलपमेंट
या प्रक्रियमध्ये दोन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. मात्र कोरोनावरील लसीच्या या प्रक्रियेत जलद काम सुरु आहे. यामागील कारण असे आहे की, चीन सरकारला जानेवारीत विषाणूचा जेनेटिक सिक्वेंस आढळला होता. त्यावेळी कोरोना विषाणू फक्त चीनमध्ये होता. जास्तकरून लस ही विषाणूच्या प्रोटीनऐवजी त्यांच्या जेनेटिक स्विक्वेंसच्या आधावर असते.

दुसरा टप्पा : प्री-क्लिनिकल
रिसर्च आणि डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर, या लसीची चाचणी प्राणी आणि झाडांवर केली जाते. यामध्ये त्यांची क्षमता आणि कामकाज यांचे विश्लेषण केले जाते. यावेळी लस दिल्यानंतर प्राणी आणि झाडांची प्रतिकार शक्ती वाढते की नाही, हे संशोधक पाहणी करतात. जर लसीचा प्रभाव झाला नाही, तर पुन्हा लसीची चाचणी पहिल्या टप्प्यावर जाते, त्यामुळे प्रक्रिया पुन्हा लांबते.

तिसरा टप्पा : क्लिनिकल ट्रायल
लस तयार करण्याचा हा सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा असतो. कारण, लसीच्या क्षमतेची चाचणी मानवावर केली जाते. या टप्प्यात 90 महिन्यांपर्यंत किंवा सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी घेण्याची क्षमता ठेवली आहे. या टप्प्यात सुद्धा आणखी तीन टप्पे असतात. यात बरेच असे उमेदवार आहेत, जे दुसऱ्या टप्प्यात यशस्वी होतात. परंतु तिसऱ्या टप्प्यात अपयशी ठरतात. 
1) या लसीचा उपयोग लोकांच्या लहान समुहावर केला जातो आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत की नाही याची तपासणी केली जाते. याला सुमारे तीन महिने लागू शकतात.
2) ज्या लोकांना लस द्यावयाची आहे, त्यांची संख्या हजारोपर्यंत वाढविली जाते. यासाठी सरासरी 6 ते 8 महिने लागू शकतात. यामध्ये रोगाची प्रतिकारशक्ती (इम्यून रिस्पॉन्स) विकसित झाली की नाही हे पाहिले जाते. यावेळी लसीच्या सामान्य आणि उलट प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या क्षमतेचे देखील विश्लेषण केले जाते. कोरोना विषाणूच्या बाबतीत हा टप्पा छोटा करण्यात आला आहे, कारण काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यामध्ये असणारे बरेच उमेदवार आता क्लिनिकल ट्रायल टप्प्यात पोहोचले आहेत.
3) हजारो लोकांवर लसीचे मूल्यांकन  केले जाते आणि जास्त लोकांमध्ये ही लस कशी कार्य करते, हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पुन्हा 6 ते 8 महिने लागू शकतात.

चौथा टप्पा : रेग्युलेटरी रिव्यू (नियामक पुनरावलोकन)
मानवी चाचण्यांचे अनेक टप्पे यशस्वी झाल्यानंतर लस निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत जाण्यापूर्वी नियामक समर्थनाची आवश्यकता असते. सामान्यत: याला बराच वेळ लागतो, परंतु अशा सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीत, कालावधी कमी केला जाऊ शकतो.

पाचवा टप्पा : मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी कंट्रोल (उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण)
या टप्प्यात, लस तयार करणार्‍या कंपनीला चांगल्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक संसाधनांची आवश्यकता असते, जेणेकरुन लस तयार करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू केली जाऊ शकेल.

रोगावर मात करण्यासाठी लसच का?
लस हे एक प्रकारचे औषध आहे, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि विषाणूशी लढायला मदत करते. रुग्णाच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा एक मार्ग म्हणजे लस. कोणताही रोग टाळण्यासाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे. ही लस रोगप्रतिकारक यंत्रणेस उत्तेजित करते व अँटिबॉडीज तयार करते. बहुतेक लस इंजेक्शनद्वारे दिल्या जातात, परंतु काही तोंडी किंवा नाकाद्वारे देखील दिली जातात. आतापर्यंत पोलिओ, टिटॅनस, डिप्थीरिया, मेनिंजायटीस, इन्फ्लूएन्झा, टाइफाइड अशा 25 हून अधिक जीवघेण्या रोगांपासून वाचविण्यासाठी लस दिली जाते.

Web Title: CoronaVirus News: How long does it take to develop a vaccine? what about history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.