CoronaVirus News: चिंतेत भर! तिसऱ्या लाटेत 'त्या' जिल्ह्यांमध्ये असणार कोरोनाचा सर्वाधिक कहर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 09:56 AM2021-08-01T09:56:24+5:302021-08-01T09:56:50+5:30
CoronaVirus News: तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरच्या राज्यांना महत्त्वपूर्ण सूचना
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले. त्यामुळे काही भागांत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. तिसऱ्या लाटेची भीती असताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लाटेची तीव्रता फारशी असणार नाही, असं आयसीएमआरनं सांगितलं आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा अनुभवलेल्या जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेत दिलासा मिळेल. या जिल्ह्यांमध्ये तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल, असा आयसीएमआरचा अभ्यास सांगतो.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्हा स्तरावर नियोजन करा आणि स्थानिक आकडेवारी विचारात घेऊन पावलं उचला, अशा सूचना आयसीएमआरनं राज्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये जिल्ह्यानुसार परिस्थिती बदलते. त्यामुळे जिल्हा पातळीवर नियोजन अतिशय महत्त्वाचं असल्याचं आयसीएमआरच्या महामारी आणि संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ महामारीतज्ज्ञ समीरन पांडा यांनी सांगितलं.
संपूर्ण राज्यात तिसरी लाट असं ढोबळपणे म्हणणं अयोग्य ठरेल. कारण सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम एकसारखाच असणार नाही. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी जिल्हा स्तरावर नियोजन गरजेचं आहे. याबद्दलचं व्यवस्थापन करण्यासाठी योजना आखायला हवी, असं पांडा म्हणाले. दुसऱ्या लाटेत ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप अधिक नव्हता, त्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लाटेत अधिक लोक अतिसंवेदनशील असतील. त्या व्यक्तींच्या समूहाचं लसीकरण लवकर करायला हवं, असं पांडांनी म्हटलं.