CoronaVirus News: सहा दिवसांत जगात सर्वाधिक मृत्यू भारतात; आरोग्य यंत्रणाही झाली अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 12:40 AM2020-09-08T00:40:54+5:302020-09-08T07:01:17+5:30
अमेरिकेलाही टाकले मागे
- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : गेल्या सहा दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर वाढला असल्याने दररोज होणारे मृत्यूही वाढले आहेत. भारतात सात दिवसांमध्ये दररोज सरासरी एक हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण दगावले. अमेरिकेत भारतापेक्षा रुग्णसंख्या जास्त असली तरी तेथे आठवडाभरात दररोज मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र लक्षणीयरीत्या घटले आहे. पहिल्या चार देशांमध्ये भारत पहिल्या, तर रशिया चौथ्या स्थानी असून, दोन्ही देशांच्या दररोजच्या कोरोना मृत्यूसंख्येत सरासरी ८०० चे अंतर आहे. भारतात मृत्यूदर जगात कमी असला तरी आता दररोजच्या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणाही अस्वस्थ आहे.
१ ते ६ सप्टेंबरदरम्यान भारतात ६२५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याच काळात रुग्णसंख्याही रोज ९० हजारांवर पोहोचली आहे. अमेरिकेत सहा दिवसांमध्ये रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण घटले. ब्राझीलमध्ये तर दररोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सहा दिवसांत सरासरी ६०० ने घटली, तर रशियात सप्टेंबरमध्ये दररोज सरासरी १०० जण कोरोनामुळे दगावले. भारत त्यामुळे कोरोना लागण व मृत्यूचे नवे केंद्र बनला आहे. १ सप्टेंबरला भारतात १०२५ जणांचा मृत्यू झाला.
कोरोना पॉझिटिव्हिटी दर ७.२ टक्क्यांवरून १२.६०% वर
भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या तीन लाख चाचण्या कमी झाल्या तरी पॉझिटिव्हिटी दर ७.२ टक्क्यांवरून १२.६० टक्के झाला. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या आकडेवारीनुसार ९०८०२ नवे कोरोना रुग्ण सापडले. आयसीएमआरनुसार गेल्या २४ तासांत ७२०३६२ जणांचे नमुने घेतले गेले.
गेल्या २४ तासांत ६९५६४ कोरोनाबाधित बरे झाले. देशात आता एकूण ३२,५०,४२९ कोरोना रुग्ण बरे झाले. देशात कोरोनाचे ८,८२५४२ सक्रिय रोग्यांवर उपचार सुरू आहेत. सोमवारपर्यंत देशात एकूण बाधितांची संख्या ४२०४६१३ झाली. कोरोनाने आतापर्यंत ७१६४२ जणांचा मृत्यू झाला. त्यात गेल्या २४ तासांत १०१६ जण मरण पावले. देशाचा रिकव्हरी दर ७७.३० टक्के व मृत्यूदर दर १.७० टक्के झाला.
वयोवृद्ध कोरोना रुग्णांसाठीच्या उपाययोजनांचा तपशील द्या : सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश
कोरोना साथीच्या काळामध्ये वयोवृद्ध रुग्णांच्या उपचारांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या याची सविस्तर माहिती राज्यांनी नवीन प्रतिज्ञापत्रांद्वारे सादर करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. च्न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा आदेश दिला. यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. कोरोनाची लागण झालेल्या वयोवृद्धांना अधिक उत्तम वैद्यकीय उपचार मिळायला हवेत, त्यांची अतिशय काळजी घेण्यात यावी याकरिता उपाययोजना करण्याचे न्यायालयाने सरकारला आदेश द्यावेत अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती.
याचिकादाराने म्हटले आहे की, कोरोना झालेल्या रुग्णांपैकी अनेकांना राज्य सरकारांच्या विविध योजनांन्वये पेन्शनही मिळते. त्यामुळे या लोकांची ओळख पटविणेही सोपे आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी काय पावले उचलली याचे अहवाल राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयाला सादर केले आहेत. मात्र तेवढे पुरेसे नाही.
राज्यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यांची सखोल माहिती त्यांनी न्यायालयाला सादर करणे अपेक्षित आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा संसर्ग झालेल्या वयोवृद्धांना व्यवस्थित उपचार मिळालेले नाहीत याची काही उदाहरणे यात नमूद आहे. मास्क, औषधे, सॅनिटायझर तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा राज्यांनी करावा. त्यात हयगय करू नये असे ४ आॅगस्ट रोजी सुनावणीत बजावले होते.
सर्व तक्रारींचा निपटारा करा
कोरोना रुग्णांनी केलेल्या सर्व तक्रारींची दखल घेऊन राज्य सरकारांनी योग्य उपाययोजना करावी. त्या रुग्णाला भेडसावणारी समस्या मोठी आहे की छोटी याचा राज्य सरकारने विचार करू नये. वृद्धाश्रमांमध्ये नीट सॅनिटायझेशन केले जावे. तेथील वृद्धांचीही अतिशय काळजी घेण्यात यावी असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.