CoronaVirus News: शुभसंकेत! कोरोना संकटात देशाला डबल दिलासा; ४० दिवसांनंतर प्रथमच 'असं' घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:44 AM2021-05-25T08:44:05+5:302021-05-25T08:46:56+5:30
CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाल्यानं दिलासा
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला दर दिवशी देशात ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. आता मे महिना संपता संपता हाच आकडा २ लाखांच्या खाली आला आहे. १४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच देशात दिवसाला २ लाखांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना मृतांचा आकडा मात्र वाढला होता. त्यातदेखील आता घट झाली आहे.
दिलासादायक! राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण घटले, पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षाही खाली
१४ एप्रिलनंतर प्रथमच देशात २ लाखांहून कमी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेले ४० दिवस देशात दररोज २ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. त्यात आता लक्षणीय घट होताना दिसत आहे. https://www.covid19india.org/ च्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ९५ हजार ६८५ नवे रुग्ण आढळून आले. तर ३ लाख २६ हजार ६७१ नव्या रुग्णांची नोंद झाली.
सामान्यांना लोकल तूर्त बंदच, आता जिल्हानिहाय निर्बंधांचा सरकारचा विचार
देशात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढला होता. अनेक दिवस ४ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता हा आकडा साडे तीन हजारांच्या खाली आला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३ हजार ४९६ जण दगावले आहेत. ३ मेनंतर प्रथमच देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या साडे तीन हजारांच्या खाली आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाला आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या २६ लाखांच्या खाली
दररोज आढळून येत असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यानं सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. गेल्या २२ दिवसांपासून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. ३ मे रोजी देशातील ऍक्टिव्ह रुग्णांचं प्रमाण १७.१० टक्के होतं. आता ते १० टक्क्यांच्या खाली आलं आहे. गेल्या २ आठवड्यांत ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १० लाखांनी कमी झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २६ लाखांच्या खाली आहे.