CoronaVirus News : चाचण्या घेण्यात भारताचा विक्रम नऊ दिवसांत एक कोटी, एकूण सहा कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 01:05 AM2020-09-17T01:05:33+5:302020-09-17T06:26:49+5:30
अवघ्या सात महिन्यांत भारताने चाचण्यांच्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : फक्त नऊ दिवसांत भारताने एक कोटी कोरोना चाचण्या करून विक्रम नोंदवला आहे. यामुळे एकूण चाचण्यांची संख्या सहा कोटींवर गेली. पहिल्या एक कोटी चाचण्या १५८ दिवसांत पूर्ण झाल्या. अवघ्या सात महिन्यांत भारताने चाचण्यांच्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळा १०० वरून १५ सप्टेंबरपर्यंत १७३६ झाल्या.
११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण
भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या ११ दिवसांत ४० लाखांवरून ५० लाखांवर गेली आहे. याचा अर्थ ११ दिवसांत १० लाख नवे रुग्ण आढळून आले. या साथीच्या प्रारंभीच्या काळात रुग्णसंख्येचा एक लाखाचा टप्पा गाठायला ११० दिवस लागले होते, तर त्यापुढील ५९ दिवसांत ही रुग्णसंख्या १० लाख झाली होती. त्यापुढच्या २१ दिवसांत रुग्णसंख्या १० लाखांवरून २० लाखांवर गेली. १६ दिवसांत या रुग्णांची संख्या २० लाखांवरून ३० लाखांवर पोहोचली. या कालावधीत रुग्णसंख्या वाढीचा वेग आणखी वाढला. अवघ्या १३ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांवरून ४० लाख झाली होती.
देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 50,00,000
- 90123 नवे रुग्ण बुधवारी देशामध्ये आढळून आले असून, एकूण रुग्णांची संख्या आता ५० लाखांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आणखी १२९० जण मृत्यू पावले असून, एकाच दिवसातील मृतांची ही सर्वाधिक संख्या आहे. आता कोरोना बळींची एकूण संख्या ८२,०६६ झाली
आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५०,२०,३५९ वर पोहोचली आहे. त्यातील ३९,४२,३६० जण या आजारातून बरे झाले आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील अमेरिकेमध्ये ६७ लाख ८८ हजार रुग्ण आहेत, तर दुसऱ्या स्थानावरील भारतातली रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा १७ लाखांनी कमी आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.६३ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.
सध्या देशात ९,९५,९३३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून ही संख्या एकूण रुग्णांच्या तुलनेत १९.८४ टक्के आहे. आयसीएमआरनुसार मंगळवारी कोरोनाच्या ११,१६,८४२ चाचण्या करण्यात आल्या.