CoronaVirus News : ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 11:30 PM2020-05-01T23:30:36+5:302020-05-02T06:41:41+5:30
ग्राहकांनी दारूच्या दुकानाबाहेर सहा फूट अंतर ठेवून रांग लावावी, अशी अटही मोदी सरकारनं घातली आहे.
नवी दिल्लीः ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं खुली ठेवण्यासाठी केंद्रानं सशर्त परवानगी दिली आहे. ग्राहकांनी दारूच्या दुकानाबाहेर सहा फूट अंतर ठेवून रांग लावावी, अशी अटही मोदी सरकारनं घातली आहे. वाइन शॉप्स आणि पानाच्या दुकानांसमोर सहा फुटांचं अंतर बंधनकारक करण्यात आलं असून, सोमवारपासून दुकानं उघडण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने दारूची दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी म्हणजेच 4 मेपासून 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्याच दरम्यान केंद्र सरकारनं ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप आणि पानाची गादी सुरू करण्यास अटी अन् शर्थींवर मान्यता दिली आहे.
Liquor stores & paan shops will be allowed to function in green zones while ensuring minimum six feet distance (2 gaz ki doori) from each other & ensuring that not more 5 persons are present at one time at the shop: MHA on the extension of #lockdown for two weeks from May 4
— ANI (@ANI) May 1, 2020
मुंबई, पुणे व दिल्ली रेड झोनमध्ये असल्याने तेथील नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. रुग्णसंख्या कमी होत जाण्यासाठी तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली. २१ एप्रिलला जारी केलेल्या मार्गदर्शिकेमुळे अनेक दुकाने उघडली होती. ग्रामीण भागातील व्यवहार पूर्वपदावर येत होते. देशात सर्वाधिक रेड झोन उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांत असून, ते अनुक्रमे १९ व १४ इतके आहेत. तामिळनाडूमध्ये १२, दिल्लीमध्ये ११ रेड झोन आहेत.
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर हे रेड झोनमध्ये तर गाझियाबाद ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या राज्यातील रेड झोनमध्ये लखनऊ, आग्रा, सहारनपूर, कानपूर नगर, मोरादाबाद, फिरोजाबाद, बुलंदशहर, मेरठ, रायबरेली, वाराणसी, अमरोहा, संत कबीरनगर, अलिगढ, मुझफ्फरनगर, रामपूर, मथुरा व बरेली आदी विभागांचाही समावेश आहे. दिल्लीच्या एनसीआरमधील आणखी काही भाग, हरयाणातील गुरगावचा प्रदेश हे ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
कोरोना साथ व लॉकडाऊन संदर्भातील देशातील स्थितीचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये आढावा घेण्यात आला. लागू केलेल्या निर्बंधामुळे कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात नक्कीच यश मिळाले असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे ४ मेपासून लागू होतील. त्यानुसार काही जिल्ह्यांतील निर्बंध शिथील केले जातील. त्याची घोषणा येत्या काही दिवसांत होईल, असे केंद्रीय गृह विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे.