CoronaVirus News : लॉकडाऊनने ७८ हजार मृत्यू रोखले; सक्षम गटाचे डॉ. व्ही. के. पॉल यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:30 AM2020-05-23T04:30:42+5:302020-05-23T04:31:03+5:30
डॉ. व्ही. के. पॉल शुक्रवारी येथे म्हणाले की, ‘‘देशात आज पाच राज्यांत कोविड-१९ चे ८० टक्के आणि दहा राज्यांत ९५ टक्के रुग्ण आहेत.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशात २० लाख कोरोना रुग्ण होणे आणि ७८ हजार मृत्यू रोखता आले, असे नीती आयोगाचे सदस्य आणि कोविड-१९ वरील सक्षम गटाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले. देशात कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) चाचण्यांची संख्या वाढली तशी रोज पाच हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे असे की, योग्यवेळी लॉकडाऊन लागू केले नसते तर आज देशात १४ ते २९ लाख रुग्ण
असते.
डॉ. व्ही. के. पॉल शुक्रवारी येथे म्हणाले की, ‘‘देशात आज पाच राज्यांत कोविड-१९ चे ८० टक्के आणि दहा राज्यांत ९५ टक्के रुग्ण आहेत. देशात स्थिती नियंत्रित करण्यात मदत मिळत आहे ही चांगली बाब आहे आणि कोरोना रुग्ण दोनपट होण्याचा दर आता १३.३ वर आला तर रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्के झाला आहे.’’
डॉ. पॉल म्हणाले की, ‘‘अनेक मॉडेलमधून हे समोर येत होते की, देशात कोविड-१९ मुळे ३७ ते ७८ हजार लोकांचा मृत्यू होऊ शकला असता व योग्यवेळी लॉकडाऊन लागू केला नसता तर १४ ते २९ लाख रुग्ण असते.
लॉकडाऊन जाहीर केला आणि कोट्यवधी लोकांनी घरातच राहून लॉकडाऊनची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. मास्क वापरला, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे जगात इतर देशांत कोविड-१९ चा फैलाव झाला तसा आपल्या देशात झाला नाही.’’
५ राज्यात ८0% रुग्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली आणि तमिळनाडू या पाच राज्यांत जवळपास ८० टक्के कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर दहा राज्यांत (महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, तमिळनाडू,राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश) ९५ टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखता आले, असेही डॉ. पॉल म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘‘देशात कोविड-१९ चा मृत्यूदर ३.१३ वरून ३.०२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांत ३२३४ रुग्ण बरे झाले तर ४८५३४ रुग्ण बरे झाले आहेत.’’