CoronaVirus News: लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये १२.२ कोटी लोक बेरोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:00 AM2020-05-29T00:00:39+5:302020-05-29T00:01:04+5:30
देशातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेले सारे प्रयत्न लॉकडाऊनच्या काही महिन्यांमुळे फोल ठरणार आहेत.
नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग-धंदे बंद ठेवावे लागल्याने एप्रिल महिन्यामध्ये देशभरात १२.२ कोटी लोक बेकार झाले आहेत, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संघटनेने म्हटले आहे. बेकार झालेल्या लोकांमध्ये फेरीवाले, बांधकाम मजूर, रिक्षाचालक आदींचा समावेश आहे.
या संघटनेने यासंदर्भात नुकतीच एक पाहणी केली होती. आयपीइ ग्लोबल या संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक अश्वजित सिंग यांनी सांगितले की, देशातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेले सारे प्रयत्न लॉकडाऊनच्या काही महिन्यांमुळे फोल ठरणार आहेत. बेकारीच्या प्रमाणात यंदाच्या वर्षी घट होण्याची शक्यता नाही. भारतात कोरोनाच्या संसर्गापेक्षा भूकबळींची संख्या जास्त असेल असेही ते म्हणाले.
देशातील गरिबातल्या गरीब माणसाला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे आश्वासन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. कोरोना साथीमुळे देशात लॉकडाऊन लागू करावे लागणे ही मोदीसरकारसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीची गोष्ट ठरू शकते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत विजय मिळवून मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. देशातील गरिबांसाठी गॅस सिलिंडर, वीज, गृहबांधणी अशा योजना पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीत राबविल्याने नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकांत पुन्हा घवघवीत यश मिळाले होते.
गरीबीचे प्रमाणही वाढणार
लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या बेकारीमुळे आणखी १०.४ कोटी लोक पुन्हा दारिद्रयरेषेखाली ढकलले जाणार आहेत. त्यामुळे देशात गरीबांची संख्या वाढणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात गरीबीचे प्रमाण कमी होऊन गरीबांची सर्वात जास्त संख्या असलेल्या देशांतून भारताचे नाव वगळले जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण लॉकडाऊनमुळे आता भारत पुन्हा गरीबीच्या भोवºयात सापडला आहे.