CoronaVirus News: उपचारासाठी घरे गहाण, दागिने विकले, कर्जे काढली; कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांची आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:55 AM2021-06-02T05:55:25+5:302021-06-02T05:55:50+5:30
अनेक परिवार आपली घरे व इतर आपल्या मालमत्ता गहाण टाकून, दागदागिने मोडून अथवा कर्जे घेऊन रुग्णालयांची बिले भरीत आहेत. त्यामुळे असंख्य कुटुंबे कफल्लक झाली आहेत.
नवी दिल्ली : ‘कोविड-१९’च्या उपचारासाठी रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेली बिले भरताना नागरिकांच्या नाकी नऊ येत असल्याच्या बातम्या देशभरातून येत आहेत. अनेक परिवार आपली घरे व इतर आपल्या मालमत्ता गहाण टाकून, दागदागिने मोडून अथवा कर्जे घेऊन रुग्णालयांची बिले भरीत आहेत. त्यामुळे असंख्य कुटुंबे कफल्लक झाली आहेत.
गुवाहाटीच्या एका ५० वर्षीय छोट्या व्यावसायिकाने सांगितले की, गेल्या महिन्यात मी बाधित झालो. माझा संसर्ग सामान्य होता, पण माझा भाऊसुद्धा बाधित झाला. त्याची प्रकृती खालावली होती. आम्ही अनेक रुग्णालये पाहिली, मात्र त्यांची फी आमच्या आवाक्याबाहेर होती. नंतर एका रुग्णालयाने एकरकमी १.७ लाखांत उपचार देण्याचे मान्य केले.
बजेटपेक्षा थोडेसे जास्त असूनही आम्ही भावाला तेथे भरती केले. उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाने जे बिल दिले, ते ठरलेल्या रकमेपेक्षा दुप्पट होते. औषधी आणि इतर अनेक बाबींचे अतिरिक्त शुल्क त्यांनी आकारले होते. आम्ही दिवसभर वाद घातला, पण पूर्ण बिल भरल्याशिवाय रुग्णालयाने आम्हाला सुटी दिली नाही. आता आम्ही पूर्ण बरे झाले असलो तरी बिल भरण्यासाठी केलेल्या उसनवाऱ्यांनी जिवाला चिंता लावली आहे.
तेलंगणातील एका १८ वर्षीय तरुणाने सांगितले की, दोन आठवड्यांपूर्वी माझे वडील बाधित झाले. आम्ही अनेक खासगी रुग्णालये धुंडाळली, पण दाखल करण्यापूर्वीच रुग्णालये २ लाख रुपये मागत होते. शिवाय, ७५ हजार रुपये उपचारांचा खर्च होता. तेवढे पैसे नसल्यामुळे आम्ही वडिलांना सरकारी रुग्णालयात दाखल केले.
दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. मणिपूर येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमाटोग्राफर इरोम मैपाक यांच्या उपचाराचे ९ लाखांचे बिल झाले. त्यांची पत्नी रिटा थौनाओजाम यांनी आपला एक लाखाचा नेकलेस मोडला आणि उरलेले पैसे मित्र व नातेवाइकांकडून उसने घेतले.
अनेक राज्यांनी रुग्णालयांच्या बिलांना मर्यादा घालणारे नियम केले असले तरी त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे सूत्रांनी सांगितले.
हैदराबादेतील एका इलेक्ट्रिशियनवरील उपचाराचे २३ लाख रुपयांचे बिल रुग्णालयाने काढले. विशेष म्हणजे त्यांनी एक लाख ॲडव्हान्स दिलेले होते आणि ३.५ लाख रुपये उपचारादरम्यान भरले होते. घर गहाण टाकण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.