CoronaVirus News: दिल्लीत कोरोना नियंत्रणाचा मराठी सूत्रधार; दीपक शिंदे यांनी केली अनेक आव्हानांवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:19 AM2020-05-30T00:19:57+5:302020-05-30T06:13:42+5:30

लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होऊ नये याची काळजी घेण्यात आली.

CoronaVirus News: Marathi facilitator of corona control in Delhi; Deepak Shinde overcame many challenges | CoronaVirus News: दिल्लीत कोरोना नियंत्रणाचा मराठी सूत्रधार; दीपक शिंदे यांनी केली अनेक आव्हानांवर मात

CoronaVirus News: दिल्लीत कोरोना नियंत्रणाचा मराठी सूत्रधार; दीपक शिंदे यांनी केली अनेक आव्हानांवर मात

googlenewsNext

- भावेश ब्राह्मणकर

नवी दिल्ली : राजधानीतील कोरोना संकटाचा मुकाबला करणाऱ्यांमध्ये एका मराठी अधिकाऱ्यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. उत्तर दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात जिल्हाधिकारी दीपक शिंदे यांचे नेतृत्व प्रभावी ठरत आहे. ‘लोकमत’शी त्यांनी केलेली ही खास बातचीत.

मरकज मशिदीत झालेल्या समारंभानंतर त्यात सहभागी झालेल्या १,१०० जणांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी उत्तर दिल्ली जिल्ह्यावर आली. यातील तब्बल ५५० जणांना कोरोनाची बाधा झाली. या सर्वांची योग्य देखभाल करण्यात आली. त्यामुळेच एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, असे जिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले. जून २०१९ पासून ते या जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. जिल्ह्यात २० कंटेन्मेंट झोन आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १,४०० जणांना बाधा झाली. त्यातील ५०० पेक्षा अधिक जण उपचार घेऊन बरे झाले. ९०० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी जिल्ह्यात १२ दिवस एवढा असल्याचे शिंदे म्हणाले.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे, डीडीए बिल्डिंगमध्ये १,७०० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर निर्माण करणे, ११६ निवारा केंद्रांद्वारे दररोज ९० हजार जणांच्या सकाळी आणि सायंकाळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. रेशनचे वितरण करण्यासाठी ४४ शाळांमध्ये केंद्रे सुरू करण्यात आली. आता दिल्ली सरकारच्या वतीने रेशन कीटस्चे वाटप केले जात आहे.

लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होऊ नये याची काळजी घेण्यात आली. उत्तर जिल्ह्यात पिठाच्या गिरण्या अधिक आहेत. त्यामुळे संघटनेशी चर्चा करून त्या सुरू ठेवल्या आणि पुरवठा होत गेला, असे शिंदे म्हणाले. चौथ्या लॉकडाऊनमध्ये मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याचा प्रश्न होता. आतापर्यंत आम्ही ३० ते ४० हजार मजुरांना पंजाब व हरयाणामध्ये सुखरूपरीत्या पाठविले. त्यांची आरोग्य तपासणी, प्रवासातील त्यांच्या पाणी व जेवणाची सुविधा आम्ही केली.

देशातील सर्वात मोठी आझादपूर बाजार समिती याच जिल्ह्यात आहे. ती २४ तास सुरू ठेवण्याचे आव्हान होते. तेसुद्धा आम्ही स्वीकारले. कारण, केवळ दिल्लीच नाही, तर लगतच्या अनेक राज्यांना तेथून भाजीपाला व फळांचा पुरवठा होतो. तेथे काही जण बाधित सापडले तरी आम्ही कसोशीने प्रयत्न करुन बाजार समिती कार्यान्वित ठेवली. कंटेन्मेंट झोनमध्ये विविध पथके तैनात करून ऑपरेशन शील्ड राबविले जात आहे. विमान व रेल्वेद्वारे येणाऱ्यांना क्वारंटाईन करणे, लॉकडाऊनमधून विविध बाबींना शिथिलता देणे, ई-पासचे वितरण, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे, अशा विविध आघाड्यांवर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विभागांद्वारे काम सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी

दीपक अर्जुन शिंदे हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी बी.टेक. पदवी संपादन केली आहे. २०१२ च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामधील किणी हे त्यांचे मूळ गाव आहे. शहादरा जिल्ह्यातील महसूल विभागाचे उपायुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

Web Title: CoronaVirus News: Marathi facilitator of corona control in Delhi; Deepak Shinde overcame many challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.