CoronaVirus News: पहिल्या लाटेनंतर अनेक राज्यांत वैद्यकीय सुविधांत केली कपात; बेसावध राहिल्याने झाला घात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 06:01 AM2021-04-27T06:01:03+5:302021-04-27T06:40:18+5:30
बेसावध राहिल्याने झाला घात; आरोग्यव्यवस्था कोलमडली
नवी दिल्ली : देशातील कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर ही साथ आता संपुष्टात येणार असा समज अनेक राज्यांनी करून घेतला. या साथीचा मुकाबला करण्यासाठी उभारलेल्या वैद्यकीय सुविधांमध्ये यंदाच्या वर्षाच्या प्रारंभी कपात केली. प्रशासन गाफील राहिले. त्यामुळे दुसरी लाट आल्यानंतर वैद्यकीय सुविधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी दिल्लीमध्ये कोरोना उपचारांसाठी उभारलेली चार तात्पुरती रुग्णालये यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बंद करण्यात आली. त्यावेळी दर दिवशी सुमारे २०० नवे रुग्ण दिल्ली सापडत होते. त्यामुळे ही साथ ओसरली असा सर्वांचाच समज झाला होता.
कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत उत्तर प्रदेशमध्ये या संसर्गावर उपचार करण्याकरिता ५०३ रुग्णालये उघडण्यात आली व त्यात दीड लाख रुग्णशय्या आहेत असा दावा तेथील राज्य सरकारने केला होता. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये फक्त ८३ कोरोना रुग्णालये सुरू आहेत व तिथे फक्त १७ हजार रुग्णशय्यांची सोय आहे. पहिल्या व दुस-या लाटेदरम्यानच्या कालावधीत कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णालयांतील आयसीयू विभागात व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या फक्त १८ रुग्णशय्यांची भर पडली.
दिल्लीच्या एम्समधील सूत्रांनी सांगितले की, अपु-या रुग्णशय्या व ऑक्सिजनची टंचाई हे दोन मोठे प्रश्न कोरोना रुग्णांवर उपचार करताना सध्या जाणवत आहेत. बिहारमध्ये डॉक्टर व आरोग्य सेवकांचा तुटवडा जाणवत आहे. तिथे वैद्यकीय क्षेत्रात सुमारे ५ हजार रिक्त आहेत. कोरोना साथीच्या काळातही ही पदे भरली गेली नाहीत. बिहारमध्ये ऑक्सिजन उत्पादनाचा एकही प्रकल्प नाही. त्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी बिहारला झारखंडवर अवलंबून राहावे लागत आहे.
झारखंडमध्ये प्रत्येक जिल्ह्यात कोरोनासाठी विशेष रुग्णालय सुरू करण्याचे तेथील राज्य सरकारने ठरविले. त्याप्रमाणे तिथे १२ जिल्ह्यांत उभारलेल्या कोरोना रुग्णालयांमुळे असंख्य लोकांचे प्राण वाचले आहेत. त्या राज्यात खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्ण उपचार घेत होते.