CoronaVirus News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला, अंमलबजावणी तातडीनं सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:58 AM2021-08-17T07:58:55+5:302021-08-17T07:59:11+5:30
CoronaVirus News: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारची तयारी सुरू
नवी दिल्ली: देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांच्या आत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. मात्र त्यानंतर रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. परराष्ट्र व्यापार महासंचलनालयानं (डीजीएफटी) याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 'कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटला निर्यातबंदीच्या यादीत टाकण्यात येत आहे. हा निर्णय त्वरित लागू करण्यात येत आहे,' असं डीजीएफटीनं अधिसूचनेत नमूद केलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट आल्यास भारताला मोठ्या संख्येनं कोरोना चाचण्या कराव्या लागतील. त्याची तयारी म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच, तर त्या परिस्थितीत देशातच कोरोना टेस्टिंग किट उपलब्ध असावीत या उद्देशानं रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार काल देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी २२ लाख २५ हजार ५१५ वर पोहोचली. आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ६४२ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे. ३ कोटी १४ लाख ११ हजार ९२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या घडीला ३ लाख ८१ हजार ९४७ जणांवर उपचार सुरू आहेत.