CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच शब्द फिरवला; यू टर्नमुळे कोरोना संकट आणखी वाढण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:44 AM2021-05-21T08:44:02+5:302021-05-21T08:46:43+5:30
CoronaVirus News: दोन महिन्यांपूर्वी केलेल्या विधानावरून पंतप्रधान मोदींचं घूमजाव; कोरोना संकट वाढण्याची भीती
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. त्यातच आता केंद्र सरकारनं कोरोना चाचण्यांवरून मोठा यू टर्न घेतला आहे. कोरोना चाचण्यांमधील आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण ७० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर आणण्याची तयारी केंद्रानं सुरू केली आहे. आरटीपीसीआर चाचणी सर्वाधिक विश्वसनीय मानली जाते. मात्र आता सरकारनं एकूण चाचण्यांमधील याच चाचणीचं प्रमाण कमी करण्याचं ठरवलं आहे.
कोरोनाच्या संकटात मोठा निष्काळजीपणा! देशातील 50 टक्के लोक मास्कच वापरत नाहीत; रिसर्चमधून खुलासा
कोरोनाचं निदान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण ७० टक्के असायला हवं, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. मात्र आता आरटीपीसीआर चाचण्या ४० टक्क्यांवरून आणून अँटिजन चाचण्यांचं प्रमाण ६० टक्क्यांवर नेण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे. जूनच्या अखेरपर्यंत दैनंदिन चाचण्यांचं प्रमाण ४५ लाख करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
दिलासादायक! जुलैपर्यंत देशात कोरोनाची दुसरी लाट संपण्याची शक्यता, परंतु त्यानंतर...
एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण ७० टक्के असायला हवं, असा सल्ला खुद्द पंतप्रधान मोदींनी दोन महिन्यांपूर्वी राज्यांना दिला होता. 'पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त येत असल्यास असू द्या. तुमच्यावर कोणताही दबाव नाही,' असं मोदी म्हणाले होते. आता सरकारनं आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता कमी केली आहे. गेल्या आठवड्यात दिवसाकाठी १६ लाख आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. आता हीच क्षमता कमी करण्यात आली आहे. ती १२ ते १३ लाखांवर आणली गेली आहे. विशेष म्हणजे सरकारनंच ही आकडेवारी दिली आहे.
जूनच्या अखेरपर्यंत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या १८ लाखांपर्यंत नेण्याचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे. मात्र त्यावेळी एकूण चाचण्यांची संख्या ४५ लाख इतकी असेल. याचा अर्थ एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण केवळ ४० टक्के असेल. आरटीपीसीआरच्या गोल्ड स्टँडर्ड टेस्टऐवजी स्टँडर्ड टेस्ट करण्याचा सरकारचा इरादा आहे. काल आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. एप्रिल-मे महिन्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्टचं प्रमाण ५०-५० टक्के होतं अशी माहिती त्यावेळी देण्यात आली.