CoronaVirus News :देशभर ३१ मेपर्यंत लॉकडाउन; अत्यावश्यक व्यवहार वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 05:19 AM2020-05-18T05:19:09+5:302020-05-18T07:06:03+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : गृहमंत्रालयाने कोविड-१९ च्या स्थितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना श्रेणीनिहाय विभाग (रेड, ग्रीन आणि आॅरेंज झोन) ठरविण्याचा अधिकार दिला आहे. चौथ्या लॉकडाऊनदरम्यान काय करावे आणि काय करू नये, याची यादीच जारी केली आहे.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लागू असलेला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) प्राप्त अधिकारातहत केंद्र आणि राज्य सरकारचे विभाग आणि मंत्रालये आणि राज्य प्रशासनाला ३१ मेपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मेअखेरपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने लागलीच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी नऊ पानी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार अत्यावश्यक व्यवहार वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजपर्यंत संचारबंदी असेल.
गृहमंत्रालयाने कोविड-१९ च्या स्थितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना श्रेणीनिहाय विभाग (रेड, ग्रीन आणि आॅरेंज झोन) ठरविण्याचा अधिकार दिला आहे. चौथ्या लॉकडाऊनदरम्यान काय करावे आणि काय करू नये, याची यादीच जारी केली आहे. राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील (२००५) कलम ६ (२) अन्वये प्राप्त अधिकारातहत केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय कार्यकारी समितीला कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सावधानता बाळगून आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश दिल्यानुसार गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्व प्रकारचे राजकीय, धार्मिक, सामाजिक सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई असेल. शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि
विमान (एअर अॅम्ब्युलन्स वगळता), मेट्रो, रेल्वेसेवा ३१ मेपर्यंत बंद असेल. सर्व धार्मिक ठिकाणेही बंद असतील.
पुढील १४ दिवसांसाठी लॉकडाऊनसाठी योजण्यात आलेल्या उपायांची अंमलबजावणी करणे जरुरी आहे, एनडीएमएचे सदस्य सचिव जी. व्ही. व्ही. यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. त्यानंतर लॉकाडाऊन ३ मेपर्यंत आणि पुन्हा १७ मेपर्यंत वाढविला होता.
महाराष्ट्रातही निर्बंध कायमच
31 मेपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्टÑातही लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनची नियमावली राज्य सरकारने अद्याप जाहीर केली नसली तरी रेड झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लागू असलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा रविवारी संपत असतानाच राज्य सरकारने ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी या संदर्भात आदेश जाहीर केला. त्यानंतर काही वेळातच केंद्र सरकारनेही लॉकडाऊन वाढीची घोषणा केली.
मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या शहरांत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या शहरांतील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे, शहर बस वाहतूक बंदच राहाणार असून मुंबईतून आंतरराष्टÑीय विमान उड्डाण होणार नाही.
कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील काही व्यवहार सुरू झाले असले तरी जिल्हा बंदी कायम असणार आहे. तसेच राष्टÑीय आपत्ती निवारण कायद्यांतर्गंत पूर्वीचे निर्बंध कायम राहाणार आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांसोबत एकल दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी तेथेही फिजिकल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे बंद असेल
देशांतर्गत आणि आंतरराष्टÑीय हवाई प्रवास बंद (वैद्यकीय सेवा, सुरक्षा आणि एअर अॅम्ब्युलन्स वगळता)
सर्व मेट्रो रेल्वे सेवा बंद
अत्यावश्यक व्यवहार वगळता लोकांना सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी
शाळा, कॉलेज, शैक्षणिक/ प्रशिक्षण/ कोचिंग संस्था बंद
चित्रपटगृह, नाट्यगृह, प्रेक्षागृह, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, तरणतलाव, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे बंद; सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजक कार्यक्रमांना मनाई
सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनागृहे बंद
हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि अन्य आदरातिथ्य सेवा बंद असतील
हे सुरू असेल
कोरोनाच्या स्थितीनुसार राज्यांना रेड, ग्रीन आणि आॅरेंज विभाग ठरविण्याचा अधिकार
प्रतिबंधित (कंटेन्मेन्ट झोन) भागातील दुकाने सोमवारपासून वेगवेगळ्या वेळेत चालू ठेवण्याची परवानगी
सर्व दुकानांनी एकावेळी पाचपेक्षा अधिक लोकांशिवाय जमू देऊ नये, तसेच ग्राहकांदरम्यान सहा फुटांचे अंतर राखले जावे
सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांना मालगाड्यांची (रिकाम्या ट्रकसह) वाहतूक सुरू करण्याची परवानगी
आरोग्य/पोलीस/ सरकारी कार्यालये/ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीची आदरातिथ्य सेवा चालू असेल
परस्पर संमतीने राज्य, केंद्रशासित प्रदेशांना (कंटेन्मेन्ट झोन वगळता) आंतरराज्य प्रवासी बस, वाहतूक सुरू करण्याची मुभा
श्रमिक विशेष रेल्वे आणि पार्सल,
मालगाड्याच सुरू असतील.
खेळाडूंना सराव करण्यासाठी क्रीडा संकुल आणि स्टेडियम खुले ठेवता येतील; परंतु प्रेक्षकांना बंदी असेल.
६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, गंभीर असलेले लोक, गर्भवती महिला आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले घरीच राहतील
बस आगार, रेल्वेस्टेशन आणि विमान तळावरील उपाहारगृहे चालू असतील.
घरपोच अन्नपदार्थ पोहोचविणाºया रेस्टॉरंटला स्वयंपाकगृह सुरू ठेवण्याची मुभा