CoronaVirus News : देशात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ४ लाख ४0 हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 04:09 AM2020-06-24T04:09:03+5:302020-06-24T04:09:15+5:30
जगातील एकूण रुग्णांचा आकडा मंगळवारी दुपारपर्यंत ९२ लाख ८ हजारांच्यावर गेला होता.
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशाच्या विविध भागांत कोरोनाचे १४ हजार ९९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील आतापर्यंतच्या रुग्णांचा आकडा ४ लाख ४0 हजार २१५ झाला आहे. जगात सर्वाधिक म्हणजे २३ लाख ८८ हजार रुग्ण एकट्या अमेरिकेमध्ये आहेत. जगातील एकूण रुग्णांचा आकडा मंगळवारी दुपारपर्यंत ९२ लाख ८ हजारांच्यावर गेला होता.
भारतात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांतील २ लाख ४८ हजार १८९ रुग्ण बरे होऊ न घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांमध्येच १0 हजार ९९४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी दिली. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ५६. ३८ टक्के झाले आहे. सध्या १ लाख ७६ हजार १४ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाने देशात १४ हजार ११ जण मरण पावले आहेत. त्यात गेल्या २४ तासांमध्ये मरण पावलेल्या ३१२ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २४ तासांत मरण पावलेल्या ३१२ जणांमधील ११३ जण महाराष्ट्रातील तर ५८ जण दिल्लीमधील आहेत. तमिळनाडूमध्ये कोरोनाने २४ तासांत २१, तर गुजरातमध्ये १९ जणांचा बळी घेतला.
>महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू , गुजरातमध्ये गंभीर स्थिती
महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू व गुजरात या चार राज्यांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद या महानगरांत अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या चार महानगरांतून लाखो परप्रांतीय मजूर गेल्या महिनाभरात आपापल्या राज्यांत, गावी निघून गेले. त्यामुळे तिथेही कोरोनाचा फैलाव होईल, अशी भीती व्यक्त होत होती. पण बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांत तसे घडल्याचे दिसत नाही. या राज्यांमधील मोठ्या शहरांतच कोरोनाची लागण वेगाने होत आहे.