Coronavirus News: कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत रोज मोठी वाढ; २६ लाख उपचाराधीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:01 AM2021-04-26T00:01:12+5:302021-04-26T06:41:14+5:30
२६ लाख उपचाराधीन रुग्ण; बरे झाले १ कोटी ४० लाख
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण व मृतांच्या संख्येत दररोज सतत वाढच होत आहे. रविवारी कोरोनाचे सुमारे साडेतीन लाख नवे रुग्ण आढळून आले तर २७६७ जणांचा बळी गेला. सध्या देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६ लाखांहून अधिक असून १ कोटी ४० लाख लोक या संसर्गातून बरे झाले.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये सलग चौथ्या दिवशी तीन लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी कोरोना आजारातून २ लाख १७ हजार जण बरे झाले आहेत.
देशातील कोरोना बळींची एकूण संख्या १ लाख ९२ हजार झाली आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १५.८२ टक्के इतकी आहे. कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे लसीकरणही वेगाने केले जात आहे. देशात आतापर्यंत १४ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १४ कोटी ७१ लाख असून त्यातील १२ कोटी ४७ लाख लोक बरे झाले आहेत. तसेच ३१ लाख लोकांचा बळी गेला आहे. जगामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या अमेरिकेमध्ये ३ कोटी २७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील २ कोटी ५३ लाख जण बरे झाले तर ५ लाख ८५ हजार जणांचा बळी गेला. या देशात ६८ लाख उपचाराधीन रुग्ण आहेत. ब्राझिलमध्ये कोरोना बळींची संख्या ३ लाख ८९ हजार असून ती भारतापेक्षा जास्त आहे.
देशात आतापर्यंतचे सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण शनिवारी सापडले. कोरोना रुग्णांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा भारतात कितीतरी अधिक पटीने रुग्ण असण्याची शक्यता आहे. वैद्यकीय तज्ज्ञ व नागरिकांनाही तसेच वाटते, असे ब्रिटनमधील ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने शनिवारी म्हटले आहे.
ग्रामीण भागात कमी जागरूकता
कोरोनाचा संसर्ग होऊनही चाचणी न झालेले अनेक लोक भारतात असण्याची शक्यता असल्याचे मत ‘गार्डियन’च्या वृत्तात व्यक्त करण्यात आले आहे. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या लक्षणांबाबत अद्याप फारशी जागरूकता दिसत नाही.