CoronaVirus News: देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली ७८ लाखांवर; ६ लाखांहून कमी सक्रिय रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 01:50 AM2020-11-08T01:50:43+5:302020-11-08T07:01:25+5:30
देशात नवे ५०,३५६ बाधित
नवी दिल्ली : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८ लाखांपेक्षा अधिक झाली असून, त्यांचे प्रमाण ९२.४१ टक्के आहे. देशात शनिवारी आणखी ५०,३५६ कोरोना रुग्ण आढळले असून, त्यांची एकूण संख्या ८४ लाख ६२ हजारांवर पोहोचली आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सलग नवव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी होती.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कोरोनामुळे आणखी ५७७ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,२५,५६२ झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या ८४,६२,०८०, तर बरे झालेल्यांचा आकडा ७८,१९,८८६ आहे. या आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर १.४८ टक्के इतका कमी आहे. सध्या ५,१६,६३२ सक्रिय रुग्ण असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ६.११ टक्के आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटी ९७ लाख व बळींचा आकडा १२ लाख ४९ हजारांवर पोहोचलाआहे. रुग्णसंख्येच्या क्रमवारीत
अमेरिका प्रथम, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेत एक कोटी रुग्ण अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटीहून अधिक झाली आहे. युरोपमध्ये कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे तेथील स्थिती आणखी बिकट झाली आहे.