CoronaVirus News : ‘पतंजली’ला परवाना तापाच्या औषधासाठी, कोरोना उपचारांसाठी नव्हे; आयुष मंत्रालयानं कंपनीकडून मागितले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 04:04 AM2020-06-25T04:04:10+5:302020-06-25T04:05:11+5:30
पतंजलीला दिलेला परवाना कोरोनावरील उपचारांसाठी नव्हे, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे बूस्टर आणि तापावरील औषध यासाठी दिला होता.
नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोना विषाणूवर मात करणारे औषध पतंजलीने तयार केल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच उत्तराखंडच्या आयुष मंत्रालयाने म्हटले की, पतंजलीला दिलेला परवाना कोरोनावरील उपचारांसाठी नव्हे, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे बूस्टर आणि तापावरील औषध यासाठी दिला होता.
उत्तराखंडच्या वैद्यकीय परवाने देणाऱ्या प्राधिकरणाचे सहसंचालक डॉ. व्हाय. एस. रावत म्हणाले की, दिव्या फार्मसीने कोरोनावर औषधासाठी परवाना मागितला नव्हता आणि त्यांना तसा परवाना दिलेला नाही. परवाना रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे बूस्टर आणि तापावरील औषध यासाठी होता. त्यामुळे आयुष विभागाने दिव्या फार्मसीला नोटीस दिली. समाधानकारक उत्तर न आल्यास त्यांना दिलेला परवाना रद्द करण्यात येईल. आयुष मंत्रालयाने पतंजलीला या औषधाचे नाव, त्यातील घटकांची माहिती, ज्या ठिकाणी याचे संशोधन केले त्याची माहिती, नमुन्याचे घेतलेले प्रमाण, संस्थात्मक आचारसंहिता समितीने दिलेली मंजुरी, सीटीआरआय नोंदणी, औषधांचे दिसून आलेले परिणाम आणि अभ्यासातून समोर आलेली माहिती आदी सर्व तपशील सादर करण्यास सांगितले आहे.
मंगळवारी बाबा रामदेव यांनी कोरोनावर मात करणारे ‘कोरोनील’ हे औषध बाजारात आणले. या गोळ्यांमुळे रुग्ण कोरोनातून बरे झाल्याचा दावा त्यांनी केला; परंतु आयुष मंत्रालयाने पूर्ण शहानिशा केल्याशिवाय या औषधाची जाहिरात करू नका, असे सांगितले.
>अभ्यास केल्यानंतर परवाना -आयुषमंत्री
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, बाबा रामदेव यांनी कोरोनासाठी औषध पुढे आणले, ही एक चांगली बाब आहे; परंतु हे औषध नियमानुसार पहिल्यांदा आयुष मंत्रालयाकडे यायला हवे होते. पतंजलीने या औषधांच्या संदर्भातील कागदपत्रे मंगळवारी आमच्याकडे पाठविली आहेत. आम्ही त्यांचा आधी अभ्यास करू, नंतरच त्याला परवाना देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.