CoronaVirus News: प्लाझ्मा थेरपीने घटले नाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण; आजार रोखण्यातही अयशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:31 AM2020-09-11T00:31:31+5:302020-09-11T06:35:40+5:30
प्लाझ्मा थेरपीच्या परिणामकारकतेसंदर्भात आयसीएमआरने एक पाहणी केली होती.
नवी दिल्ली : प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही किंवा हा आजार रोखलाही जात नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने यासंदर्भात एका नियतकालिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.
प्लाझ्मा थेरपीच्या परिणामकारकतेसंदर्भात आयसीएमआरने एक पाहणी केली होती. तिच्या निष्कर्षात म्हटले आहे की, कोरोनाची माफक प्रमाणात लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले व ज्यांच्यावर हे उपचार करण्यात आले नाहीत अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे सुमारे २८ दिवस निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण व आजार रोखला जाणे याबाबत प्लाझ्मा थेरपी फारशी प्रभावी ठरली नसल्याचे दिसून आले.
कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या लोकांचे रक्त या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिले जाते. हे लोक बरे व्हावेत यासाठी अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपी वापरली जाते. कोरोनातून बºया झालेल्या लोकांच्या रक्तात अँटीबॉडीज असतात. त्यांच्यामुळे रुग्ण आजाराविरोधात मुकाबला करू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांना वाटले होते. प्लाझ्मा थेरपी कितपत प्रभावी आहे यासंदर्भात चीन व नेदरलँड्स येथे यापूर्वी करण्यात आलेली पाहणी अर्धवट राहिली होती.
परिणामकारकता दिसली नाही
प्लाझ्मा थेरपी किती उपयोगी ठरते, हे तपासून पाहण्यासाठी आयसीएमआरने देशातील ३९ रुग्णालयांमध्ये त्याविषयीची पाहणी २२ एप्रिल ते १४ जुलैदरम्यान केली. त्यामध्ये ४६४ जणांनी सहभाग घेतला. त्यातील २३५ जणांना प्लाझ्मा थेरपीचे उपचार देण्यात आले, तर २२९ जणांना प्लाझ्मा देण्यात आला नाही. त्यापैकी प्लाझ्मा दिलेल्यांपैकी ३४ जण, तर न दिलेल्यांपैकी ३१ जण मरण पावले. कोरोना रुग्णांच्या उपचारांत प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्याची परवानगी काही देशांमध्ये देण्यात आली आहे. मात्र, कोरोनावर प्लाझ्मा थेरपी फारशी प्रभावी ठरत नाही, हे आयसीएमआरच्या पाहणीत दिसून आले.