CoronaVirus News: ‘ऑक्सिजन वॉरिअर्स’चे मोदी यांनी मानले आभार; ‘मन की बात’मधून साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 07:07 AM2021-05-31T07:07:32+5:302021-05-31T09:04:55+5:30
१०० वर्षांमध्ये आलेली ही सर्वात मोठी महामारी असून त्यासोबत भारताने चक्रीवादळ, महापूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांचाही सामना केल्याचा उल्लेखही मोदींनी केला.
नवी दिल्ली : कोरोना महामारीशी लढताना देशात ऑक्सिजनचे संकट निर्माण झाले होते. त्यातून मार्ग काढत रुग्णांच्या प्राणांची रक्षा करणाऱ्या ऑक्सिजन वॉरिअर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. त्यांनी ७७ व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून संवाद साधला. देश संपूर्ण शक्तिनीशी कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. १०० वर्षांमध्ये आलेली ही सर्वात मोठी महामारी असून त्यासोबत भारताने चक्रीवादळ, महापूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांचाही सामना केल्याचा उल्लेखही मोदींनी केला.
मोदी म्हणाले, की निसर्ग, अम्फान, तौक्ते, यास यांसारख्या चक्रीवादळांनी तडाखा दिला. चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या सर्व राज्यातील लोकांनी मोठे धैर्य दाखविले आहे. केंद्र आणि राज्य सरकारसह प्रशासानेही एकत्रितपणे या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून अधिक जीवित हानी टाळली. पूर्वीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. या चक्रीवादळांमध्ये प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी देशात निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईचाही उल्लेख केला. रेल्वे, जहाज तसेच विमानातून ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या ऑक्सिजन वॉरिअर्ससोबतही मोदींनी संवाद साधला. त्यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करताना मोदी म्हणाले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. हे एक खूप मोठे आव्हान होते.
देशाच्या एका कोपऱ्यातून दुसरीकडे ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे आव्हान होते. मात्र, ऑक्सिजन एक्स्प्रेस, टँकर्स, हवाई दलाच्या जवानांनी या कठीण परिस्थितीत मदत करून संकटावर मात केली, असे मोदी म्हणाले.
देशात कोरोना टेस्टिंग वाढल्याचा उल्लेखही मोदींनी केला. सुरुवातीला शभर आणि हजारांच्या घरात चाचणी व्हायची. आज दररोज २० लाखांहून अधिक चाचण्या करण्यात येतात. संसर्ग झालेल्या लोकांचे नमुने घेणे धोकादायक काम आहे. नमुने घेणाऱ्यांना सतत पीपीई किट घालून राहावे लागते. हे खूप सेवेचे काम असल्याचे मोदी म्हणाले.
सरकारच्या ७ वर्षांचा उल्लेख
सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या मंत्रावर देश चालला. या ७ वर्षात अनेक कठीण परीक्षा आम्ही दिल्या. कोरोनाच्या स्वरूपात मोठी परीक्षा सुरूच आहे. मोठमोठे देशही कोरोनाच्या तडाख्यातून वाचू शकलेले नाहीत, असे मोदी म्हणाले.
देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड नाही
देशाविरोधात कट रचणाऱ्यांना आता भारत जोरदार प्रत्युत्तर देतो. हे पाहून आपला आत्मविश्वास वाढतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत भारत तडजोड करत नाही. सैन्याची ताकद वाढते. हे पाहून वाटते, की आपण योग्य मार्गावर असल्याचे मोदी म्हणाले.