"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 09:50 AM2020-05-11T09:50:31+5:302020-05-11T10:29:51+5:30
विस्टन चर्चिल यांच्याप्रमाणे सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा काटजूंचा सल्ला
नवी दिल्ली: आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखले जाणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी देशातील सद्यस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. कोरोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. आता परिस्थिती मोदींच्या नियंत्रणात नाही. या संकटाचा सामना करणं एकट्या मोदींना झेपणार नाही. त्यामुळे त्यांनी इंग्लंडचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांचं अनुकरण करावं, असा सल्ला काटजू यांनी दिला.
देशातील कोरोनाचं संकट, रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर काटजू यांनी 'द वीक'साठी एक लेख लिहिला आहे. 'देशासमोरील समस्या खूप मोठी आहे. या समस्येला एकटे मोदी आणि भाजपा तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी एक राष्ट्रीय सरकार स्थापन करावं. या सरकारमध्ये सर्वपक्षीय नेते, वैज्ञानिक, प्रशासकीय तज्ज्ञांचा समावेश असावा,' असा सल्ला काटजू यांनी दिला आहे.
काटजूंनी त्यांच्या लेखात लेखात चर्चिल यांचं उदाहरण दिलं आहे. 'इंग्लंडचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी मे १९४० मध्ये राष्ट्रीय सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी इंग्लंडसमोर नाझी जर्मनीनं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चर्चिल यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन केलं. त्यामुळे इंग्लंडच्या संसदेत विरोधी पक्षच नव्हता. कारण विरोधी पक्षालादेखील सरकारमध्ये स्थान देण्यात आलं होतं,' असं काटजूंनी लेखात म्हटलं आहे.
चर्चिल पंतप्रधान असताना त्यांच्यासमोर जर्मनीचं संकट होतं. तसा परकीय आक्रमणाचा कोणताही धोका आपल्यासमोर नाही. पण कोरोनाचा संकट तितकंच गंभीर असल्याचं काटजूंनी लिहिलं आहे. 'देशासमोर मोठी गंभीर समस्या आहे. एकटे मोदी किंवा भाजपा या समस्येशी दोन हात करू शकत नाहीत. अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असून कोरोनानं परिस्थिती आणखी बिकट झाली आहे,' असं मत काटजूंनी व्यक्त केलंय.
...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर
गिलगिट-बाल्टिस्तानवर भारताच्या 'मास्टरस्ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा
ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज