CoronaVirus News: पोलीस, सुरक्षा रक्षकांचीही करा कोरोना चाचणी- आयसीएमआर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:44 PM2020-05-27T23:44:12+5:302020-05-27T23:45:16+5:30
आघाडीच्या फळीतील लोकांच्या यादीत वाढ
नवी दिल्ली : पोलीस, इमारतींचे सुरक्षारक्षक, विमानतळ कर्मचारी, बसचालक, वाहक व अन्य कर्मचारी, भाजीपाला व औषध विक्रेते, बँक कर्मचारी हे आघाडीच्या फळीतील लोक असून, त्यांच्यापैकी ज्यांच्यात फ्लूसदृश लक्षणे दिसून येतील अशांची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे.
डॉक्टर, नर्स व अन्य वैद्यकीय कर्मचारी, स्थलांतरित मजूर यांची कोरोना चाचणी व्हायला हवी, असे आयसीएमआरने याआधीच नमूद केले होते. कोणाची कोरोना चाचणी व्हावी यासंदर्भातील धोरणात या संस्थेने १८ मे रोजी काही बदल केले. त्यानुसार कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी ज्यांच्यामध्ये ताप, घसा दुखणे, अंगदुखी अशी लक्षणे आढळतील त्यांची कोरोना चाचणी करावी, असे आयसीएमआरने म्हटले आहे. आरोग्यसेवकांप्रमाणेच इतर संस्थांतील कर्मचारी, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे विक्रेते यांनादेखील कोरोनाची लागण होण्याचा मोठा धोका आहे हे ओळखून आयसीएमआरने चाचणीविषयक धोरणात बदल केले.
आयसीएमआरने आघाडीच्या फळीतील लोकांमध्ये आता शासकीय व खासगी इमारतींचे सुरक्षारक्षक, विदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्याच्या मोहिमेत सक्रिय असलेले एअर इंडियाचे विमानचालक व अन्य कर्मचारी यांचाही समावेश केला आहे. त्यांच्यातील कोणाला फ्लूसदृश लक्षणे जाणवली, तर तात्काळ त्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले.