CoronaVirus News : देशात सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांहून कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 12:56 AM2020-12-21T00:56:33+5:302020-12-21T00:57:07+5:30
CoronaVirus News: रविवारी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण आढळून आले तर २९,६९० जण बरे झाले. रविवारी या आजारामुळे आणखी ३४१ जण मरण पावले असून बळींची संख्या १,४५,४७७ झाली आहे. देशात ३ लाख ५ हजार सक्रिय रुग्ण आहेत.
नवी दिल्ली : देशामध्ये सलग सातव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांपेक्षा कमी आहे. दररोजच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटी ३१ हजार झाली असून त्यातील ९५ लाख ८० हजार लोक बरे झाले.
रविवारी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण आढळून आले तर २९,६९० जण बरे झाले. रविवारी या आजारामुळे आणखी ३४१ जण मरण पावले असून बळींची संख्या १,४५,४७७ झाली आहे. देशात ३ लाख ५ हजार सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,००,३१,२२३ तर बरे झालेल्यांचा आकडा ९५,८०,४०२ आहे. देशामध्ये रुग्णांचा मृत्युदर १.४५ टक्के तर बरे झालेल्यांचे प्रमाण ९५.४६ टक्के आहे. जगात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७ कोटी ६६ लाखांपेक्षा अधिक असून, त्यातील ५ कोटी ३७ लाख बरे झाले.
लसीच्या दुष्परिणामाच्या खोट्या दाव्यांपासून द्या लस उत्पादकांना संरक्षण; अदर पूनावाला यांची मागणी
देशात कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचा खोटा दावा करणारे लोक व त्यांनी दाखल केलेल्या खटल्यांपासून लस उत्पादकांचे केंद्र सरकारने संरक्षण केले पाहिजे, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केली आहे.
अॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करीत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा भारतात सीरम इन्स्टिट्यूटतर्फे पार पडत आहे. या चाचण्यांमध्ये लसीमुळे आपल्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचा दावा करीत चेन्नईतील एका व्यक्तीने सीरम इन्स्टिट्यूटला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्या व्यक्तीने बदनामी केल्याचा आरोप करीत त्याला सीरमनेही १०० कोटी रुपये भरपाई मागणारी कायदेशीर नोटीस पाठवली.
या पार्श्वभूमीवर ग्लोबल टेक्नॉलॉजी समीट २०२० या कार्यक्रमात
अदर पूनावाला म्हणाले की, कोरोना लसीकरणादरम्यान प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई
करावी, अशी मागणी अनेक देशांमध्ये होऊ लागली आहे. एखाद्याने केलेला
दावा खोटा असला तरी त्याची अवाजवी प्रसिद्धी होते व त्याचा लसीकरण मोहिमेवर परिणाम होऊ शकतो. अदर पूनावाला म्हणाले की, कोरोना
साथीच्या काळात लस उत्पादकांना संरक्षण देणारा एक कायदा अमेरिकेने तयार केला आहे.