CoronaVirus News : धक्कादायक! निवडणुकीच्या राज्यांत कोरोना विषाणू फैलाव झाला दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:38+5:302021-04-14T07:26:24+5:30
CoronaVirus News: पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रत्येक सातवा नमुन्यात रुग्ण सापडला. सोमवारच्या तपासणीच्या आकडेवारींत पश्चिम बंगालमध्ये ३७,१६६ चाचण्यांत ४५११ बाधित निघाले.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत कोरोना विषाणूचा फैलाव धोकादायक वेगाने होत आहे. गेल्या एका आठवड्यात या राज्यांत कोरोना चाचण्यांत बाधितांच्या संख्येचा दर दुप्पट झाला आहे. पुद्दुचेरीत १२ एप्रिल रोजी झालेल्या कोरोना चाचणीत प्रत्येक सातव्या व्यक्तीत कोरोना संक्रमणाला दुजोरा मिळाला आहे. ३४५१ चाचण्या केल्या गेल्या. त्यात ५१२ (१४.८३ टक्के) कोरोना पॉझिटिव्ह निघाले. ६ एप्रिल रोजी ३०१८ चाचण्यांत फक्त २३७ (७.८५ टक्के) बाधित निघाले होते.
पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रत्येक सातवा नमुन्यात रुग्ण सापडला. सोमवारच्या तपासणीच्या आकडेवारींत पश्चिम बंगालमध्ये ३७,१६६ चाचण्यांत ४५११ बाधित निघाले. ६ एप्रिल रोजी २९,३९४ नमुन्यांमध्ये फक्त २०५८ बाधित होते. तपासणीत संक्रमणाचा दर सात टक्क्यांवरून १२.५३ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. केरळमध्ये सोमवारी ४५,४१७ जणांची तपासणी झाली. त्यात ५६९२ बाधित होते. ६ एप्रिल रोजी संक्रमितांचा दर निम्म्यापेक्षाही कमी होता. त्या दिवशी राज्यात ५९,०५१ चाचण्या झाल्या. त्यात फक्त ३५०२ (५.९३ टक्के) बाधित होते.
तमिळनाडूत एका आठवड्यात झालेल्या तपासणीच्या तुलनेत बाधितांची दर ४.५ टक्क्यांवरून ८.०८ टक्के झाला. १२ एप्रिल रोजी राज्यात ८२,९८२ चाचण्या झाल्या. त्यात ६७११ बाधित होते. ६ एप्रिल रोजी ८०,८५६ चाचण्यांत ३६४५ रुग्ण निघाले.
निष्कर्ष काहीसे चांगले : आसाममध्ये १२ एप्रिल रोजी १.०२ लाख चाचण्या झाल्या. त्यात फक्त ५८३ (.५७ टक्के) बाधित निघाले. राज्यात संक्रमण प्रसाराची अवस्था चांगली दिसते आहे. परंतु, तज्ज्ञांचे म्हणणे असे की, एकाच दिवशी चारपट तपासण्यांमुळे निष्कर्ष चांगले दिसत आहेत.