CoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 01:58 AM2020-05-28T01:58:42+5:302020-05-28T06:35:32+5:30
पहिल्या तीन लॉकडाउनच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या बरीच आटोक्यात होती.
नवी दिल्ली : चौथ्या लॉकडाउनच्या काळात देशभर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने, ३१ मे रोजी लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढविण्याची घोषणा होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ही घोषणा करण्याची शक्यता आहे.
पहिल्या तीन लॉकडाउनच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या बरीच आटोक्यात होती. त्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले होते आणि स्वयंशिस्त पाळल्याबद्दल देशवासीयांचे आभारही मानले होते. मात्र, चौथ्या लॉकडाउनच्या काळात रुग्णसंख्या खूपच वाढली आणि ती आता दीड लाखावर गेली आहे. त्यातच लाखो स्थलांतरित मजूर मोठ्या शहरांतून आपापल्या गावी जात असून, त्यांच्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापासून संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढविला जाईल, असे दिसत आहे.
मोठ्या शहरांत आणि त्यातही झोपडपट्ट्या, चाळी आणि दाट वस्ती असलेल्या भागांमध्येच कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळे मोठ्या शहरांवरच पाचव्या लॉकडाउनमध्ये अधिक लक्ष केंद्रित केले जाऊ शकेल. या झोपडपट्ट्या, चाळी आणि दाट वस्त्यांमध्ये कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जाईल. लाखो मजूर गावी निघून गेले असल्याने शहरांतील गर्दीही कमी झाली आहे. त्यामुळे चाचण्या घेणे सोपे होईल आणि कोरोनाचे रुग्ण शोधणे सोपे होईल, असे राज्य सरकारांनाही वाटत आहे.
लोक गावी गेल्याने शहरांत रेल्वे आणि शहरी बसमधील गर्दी काहीशी कमी होईल. परिणामी, संसर्गाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज आहे. शहरांतून लाखो मजूर गावी गेले असले आणि तिथेही प्रादुर्भाव होत असला तरी खेडी आणि लहान गावे वा शहरे यातील वस्ती विरळ असते. त्यामुळे तिथे या संसर्गाला आळा घालणे शक्य आहे, असे सर्वच राज्यांनाही वाटत आहे.
‘मन की बात’मध्ये मोदी करणार घोषणा?
धार्मिक स्थळे, मैदाने, उद्याने, व्यायामशाळा पुन्हा लोकांसाठी खुली करण्यास परवानगी दिली जाईल, असे समजते. कर्नाटक व काही राज्यांनी ३१ मेनंतर ती खुली करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, ज्या धार्मिक स्थळांमध्ये नेहमी गर्दी असते, तिथे काही निर्बंध असतील; तसेच रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनमध्ये धार्मिक स्थळे खुली करू नयेत, असा राज्यांचा आग्रह आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल्स, चित्रपटगृहे मात्र इतक्यात सुरू होण्याची शक्यता नाही; पण बहुधा चित्रीकरणाला काही प्रमाणात परवानगी मिळू शकेल, असे समजते.
धार्मिक स्थळे, मैदाने खुली करणार?