CoronaVirus News: मोठा दिलासा! 'त्या' व्यक्तींना लसीचा एकच डोस पुरेसा; इतरांपेक्षा कोरोनाचा कमी धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 07:52 PM2021-07-04T19:52:07+5:302021-07-04T19:53:25+5:30
CoronaVirus News: काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल समोर
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण अभियानाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी लसींचा साठा कमी असल्यानं लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अहवालातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे.
कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना लसीचा एक डोसदेखील पुरेसा आहे. कोरोनामुक्त झालेल्यांनी लसीचा एक किंवा दोन्ही डोस घेतल्यास त्यांना डेल्टा व्हेरिएंटपासून मिळणारं संरक्षण अधिक असतं, अशी माहिती आयसीएमआरच्या संशोधनातून पुढे आली आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होऊन गेलेल्यांनी लसीचा एक किंवा दोन्ही डोस न घेतल्यास त्यांना मिळणारं संरक्षण कोरोनाची लागण न झालेल्यांपेक्षा अधिक असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती संशोधन अहवालातून समोर आली आहे.
डेल्टा व्हेरिएंटविरोधात कोविशील्ड किती प्रभावी आहे ते तपासून पाहण्यासाठी आयसीएमआरकडून संशोधन करण्यात आलं. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएंटच कारणीभूत ठरला होता. देशातील बहुतांश नागरिकांनी कोविशील्डची लस घेतली असल्यानं आयसीएमआरकडून करण्यात आलेलं संशोधन महत्त्वाचं मानलं जात आहे.
संशोधनातून समोर आलेली महत्त्वाची माहिती
कोविशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींपैकी १६.१ टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात अँटिबॉडी तयार न झाल्याचं संशोधन सांगतं. तर एक डोस घेतलेल्यांपैकी ५८.१ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी आढळून आलेल्या नाहीत. अँटिबॉडी दिसून/आढळून न येणं आणि अँटिबॉडी तयार न होणं या दोन्ही बाबी वेगवेगळ्या असल्याचं वेल्लोरस्थित ख्रिश्चियन वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. जेकब जॉन यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं.
'कोविशील्डची लस घेतलेल्यांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या असाव्यात. मात्र त्यांचं प्रमाण कमी असल्यानं त्या डिटेक्ट झाल्या नसाव्यात. संबंधित व्यक्तीचा कोरोनापासून बचाव करू शकतील इतक्या अँटिबॉडीज त्याच्या शरीरात असू शकतात,' असं जॉन म्हणाले. '६५ वर्षांवरील व्यक्तींना मधुमेह, हायपरटेंशन, किडनी, हृदयासंबंधित अनेक गंभीर आजार असतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा व्यक्तींना तिसरा डोस देण्याची गरज आहे,' असं जॉन यांनी सांगितलं.