CoronaVirus News: तुम्ही सगळ्यांनी मोदींना 'हा' प्रश्न नक्की विचारा; मनमोहन सिंग यांची मुख्यमंत्र्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 01:00 PM2020-05-06T13:00:28+5:302020-05-06T13:12:31+5:30
CoronaVirus News: काँग्रेसप्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, सोनिया गांधी, मनमोहन सिंग उपस्थित
नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा वाढता कहर आणि त्याला रोखण्यासाठी सुरू असलेला लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तिसरा लॉकडाऊन १७ मे रोजी संपेल. त्यानंतर सरकारची नेमकी योजना काय, असा सवाल सोनिया गांधींनी उपस्थित केला.
१७ मेनंतर देशात काय होणार, सरकारनं लॉकडाऊन सुरू ठेवण्यासाठी काय निकष लावले, तिसऱ्या लॉकडाऊननंतर सरकारची रणनीती काय, असे अनेक प्रश्न सोनिया यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत उपस्थित केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील सोनिया गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तिसऱ्या लॉकडाऊननंतर नेमकं काय होणार, हे सरकारनं सांगायला हवं. लॉकडाऊननंतरची योजना काय, याची माहिती सरकारनं द्यायला हवी, असं मनमोहन सिंग म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनची स्थिती जाणून घेण्यासाठी सगळ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात. त्यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मुद्दे मांडण्याची संधी मिळते. त्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना एक महत्त्वाची सूचना केली. लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडे काय योजना आहे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारावा, असं मनमोहन सिंग म्हणाले.
राज्यांना आर्थिक पॅकेज मिळत नसेल, तर देश यातून कसा बाहेर पडेल, असा प्रश्न राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपस्थित केला. लॉकडाऊनमुळे महसुली उत्पन्न १० हजार कोटी रुपयांनी घटलं आहे. आम्ही वारंवार पंतप्रधानांकडे पॅकेजची मागणी करत आहोत. मात्र आतापर्यंत त्यांनी यावर उत्तर दिलेलं नाही, असं गेहलोत म्हणाले.
सरकारी रुग्णालयांत सेवा द्या, अन्यथा...; खासगी डॉक्टरांना सरकारचे आदेश
लॉकडाऊनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर संकट; PF व्याजदरात कपात, जाणून घ्या...
लॉकडाऊनचा जबर फटका, देशात १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला!