Coronavirus News: चिंताजनक! कोरोनाचे नवे हॉटस्पॉट सापडले; देशाचे टेन्शन वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 11:56 AM2021-05-06T11:56:43+5:302021-05-06T11:59:22+5:30
Coronavirus News: दक्षिणेतील राज्यांनी देशाचं टेन्शन वाढवलं; केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. १ मे रोजी देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या ४ लाख नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर काही दिवस कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. मात्र आज पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा स्थिरावला आहे. राज्यात लॉकडाऊन लागू असल्यानं कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. मात्र शेजारच्या राज्यांमध्ये आता कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.
मोदींच्या वाराणसीत गंभीर परिस्थिती; आमचे खासदार गरजेच्या वेळी कुठे आहे?, जनतेचा सवाल
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. गेल्या महिनाभरात दक्षिण भारतातील परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र आता ती हाताबाहेर जाऊ लागल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत दक्षिण भारतातील ४ राज्यांत कोरोनाचे १ लाख ३७ हजार ५७९ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी कर्नाटकाची अवस्था भीषण आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५० हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३४६ रुग्णांचा मृत्यू झाला.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होतील; सुब्रमण्यम स्वामींच्या इशाऱ्याने उडाली खळबळ
बंगळुरूत कोरोनाचा विस्फोट
बंगळुरूत कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. बंगळुरूची अवस्था आता दिल्लीसारखी झाली आहे. गेल्या २४ तासांत बंगळुरूत कोरोनाच्या २३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद पहिल्यांदाच देशात झाली आहे. कर्नाटकात सध्या ४ लाख ८७ हजार २८८ जणांवर उपचार सुरू आहेत.
केरळमध्ये लॉकडाऊनची घोषणा
केरळमध्ये गेल्या २४ तासांत ४१ हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. तर ५८ जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १७ लाख ४३ हजार ९३२ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी राज्यात ८ मे १६ मे दरम्यान कठोर लॉकडाऊन लागू केला आहे.
आंध्र प्रदेश, तमिळनाडूतही कोरोनाचं थैमान
आंध्र प्रदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २२ हजारहून अधिक रुग्ण सापडले. तर याच कालावधीत ८५ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ५ दिवसांत राज्यात १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तमिळनाडूतही कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २३ हजार ३१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत १६७ जणांचा मृत्यू झाला आहे.