CoronaVirus News: अडकून पडलेल्या व्यक्तींसाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:25 AM2020-05-02T06:25:04+5:302020-05-02T06:25:26+5:30
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार ही रेल्वेसेवा सेवा सुरू करण्यात आली असून संबंधित दोन राज्यांच्या विनंतीवरून या रेल्वे धावतील.
नवी दिल्ली : परराज्यात अडकून पडलेले स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी ‘श्रमिक स्पेशल’ रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने कामगार दिनी घेतला. रेल्वे मंत्रालयातले कार्यकारी संचालक राजेश दत्त बाजपेयी यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार ही रेल्वेसेवा सेवा सुरू करण्यात आली असून संबंधित दोन राज्यांच्या विनंतीवरून या रेल्वे धावतील. ही पॉइंट टू पॉइंट सेवा असून ती दोन्ही राज्यांतील प्रत्येकी एक स्टेशन वगळता इतरत्र कुठेच थांबणार नाही.
ज्या राज्यातून हे प्रवासी रवाना केले जातील त्यांनी प्रवाशांची तपासणी करायची असून ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसतील त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल. राज्य सरकारने या प्रवाशांना गटागटाने पूर्वनियोजित रेल्वे स्थानकांवर आणायचे असून त्यांच्या जेवणाची-पाण्याची सोय करायची आहे. प्रवास दीर्घ पल्ल्याचा असल्यास रेल्वेतर्फे त्यांना अन्नपुरवठा केला जाईल. प्रवासी पोहोचल्यानंतर त्या राज्याने त्यांची तपासणी तसेच विलगीकरण याबाबतचे निर्णय घ्यायचे आहेत.
तेलंगणातील लिंगमपेल्ली येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन शुक्रवारी रवाना झाली. ती शनिवारी झारखंडमधील हातिया येथे पोहोचेल. त्यातून १२०० मजूर प्रवास करत आहेत. प्रवासादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग राहावे म्हणून एका डब्यात केवळ ५६ मजुरांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.