CoronaVirus News: महसूल मिळवण्यासाठी सर्व राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं दिली आयडिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:08 PM2020-05-08T15:08:13+5:302020-05-08T15:13:48+5:30
मद्यविक्रीसाठी 'या' मार्गाचा विचार करा; अर्थव्यवस्थेचा तोल सावरण्याच्या दृष्टीनं 'सर्वोच्च' सल्ला
नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यानं महसुलाचा तुटवडा आणि उद्योगधंदे सुरू केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती अशा विचित्र कात्रीत सापडलेल्या राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. महसूल मिळवण्यासाठी दारूची ऑनलाईन विक्री करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. लॉकडाऊन असल्यानं दारूची होम डिलिव्हरी करता येईल, असं न्यायालयानं सुचवलं आहे.
'आम्ही याबद्दल कोणताही आदेश देणार नाही. मात्र राज्यांनी दारूच्या अप्रत्यक्ष विक्रीचा/होम डिलिव्हरीचा विचार करावा. सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून दारूची विक्री करावी,' असं तीन न्यायमूर्तीच्या घटनापीठाचे प्रमुख असलेल्या न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटलं. देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपला. त्यानंतर देशभरात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे ४ मेपासून देशभरात दारू खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर लांबच लांबा रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
केंद्रानं निर्बंध शिथील केल्यानं राज्यांनी मद्यविक्री करण्यास सुरुवात केली. उद्योगधंदे बंद असल्यानं राज्यांचा महसूल आटला आहे. त्यामुळे महसूल मिळवण्यासाठी राज्यांनी दारूची दुकानं सुरू करण्याचे आदेश दिले. देशातल्या अनेक राज्यांना मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळतो. बऱ्याचशा राज्यांचा २५ ते ४० टक्के महसूल मद्यविक्रीतून प्राप्त होतो. सध्या पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड या राज्यांनी ऑनलाईन मद्यविक्री सुरू केली आहे.
दिल्ली सरकारनंदेखील ऑनलाईन मद्यविक्री सुरू करण्याच्या विचारात आहे. याबद्दलची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. दिल्ली सरकारनं ऑनलाईन मद्यविक्रीसाठी http://www.qtoken.in हे संकेतस्थळ सुरू असून या माध्यमातून मद्यप्रेमींना ई-टोकन घेता येईल.