CoronaVirus News : लॉकडाउन निर्बंधाचे कडक पालन करा; केंद्राच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:09 AM2020-05-19T05:09:51+5:302020-05-19T06:12:16+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : ही स्थिती धोकादायक असून राज्यांनी लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, असे केंद्राने बजावले आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही निर्बंधांची नीट अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पुन्हा एकदा सावध केले आहे. काही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, तर काही ठिकाणी बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत. ही स्थिती धोकादायक असून राज्यांनी लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, असे केंद्राने बजावले आहे.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात केंद्राने लागू केलेले निर्बंध शिथील करण्याचा राज्य सरकारांना अधिकार नाही. कोरोना साथीची विविध झोनमधील स्थिती पाहून तेथे हवे तर, आणखी निर्बंध राज्य सरकार लादू शकते. कोरोना साथीच्या स्थितीवर राज्यांनी बारीक लक्ष ठेवावे. त्यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात कोणत्या गोष्टींचे पालन करायचे आहे; हे निश्चित करून त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत. लोकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता बाळगत केंद्रीय गृह खाते व राज्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन झाले पाहिजे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नव्या आदेशासंदभार्तील पत्रक केंद्रीय गृह खात्याने रविवारी रात्री जारी केले. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना साथीचा झालेला फैलाव लक्षात घेता राज्यांनीच रेड, आॅरेंज, ग्रीन झोन कोणते, हे निश्चित करावे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या निकषांचे पालन करावे. जिथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे; अशा भागांमध्ये वैद्यकीय व अन्य अत्यावश्यक सेवा वगळता बाकीच्या सर्व गोष्टी व व्यवहारांवर तात्पुरती बंदी घाला. लॉकडाऊनमुळे अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक व अन्य लोकांना गावी जायला विशेष रेल्वे तसेच बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
...तर साथीला निमंत्रण
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवारी सुरूवात झाल्यानंतर विविध राज्यांत काही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती; तर काही ठिकाणी मंडई, बाजारपेठा पुन्हा उघडण्यात आल्या. मात्र अशा ठिकाणी लोकांची मोठी गर्दी झाली, तर ते कोरोना साथीच्या फैलावाला आमंत्रण दिल्यासारखेच होईल.