CoronaVirus News: ...अन् विद्यार्थिनी सुखरूप परतल्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 03:05 AM2020-05-02T03:05:30+5:302020-05-02T03:05:46+5:30
ही विद्यार्थिनी महाविद्यालयात शिकत असून कोलकातातील न्यू टाऊन भागातील इमारतीत ती व तिच्या मैत्रिणी एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होत्या.
कोलकाता : शहरातील एका विभागात फ्लॅट भाड्याने घेऊन राहणाऱ्या व लॉकडाऊनमुळे एकाकी पडलेल्या एका विद्यार्थिनीला परगावातील तिच्या घरी परतण्यास पोलीस व शेजारच्या लोकांनी मोलाची मदत केली. ही घटना बुधवारी घडली. ही विद्यार्थिनी महाविद्यालयात शिकत असून कोलकातातील न्यू टाऊन भागातील इमारतीत ती व तिच्या मैत्रिणी एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होत्या. लॉकडाऊन जाहीर होण्याच्या काही दिवस आधी तिच्या मैत्रिणी आपापल्या घरी परत गेल्या होत्या. ही विद्यार्थिनी मात्र तिथे एकटी राहत होती. पण काही दिवसांनी तिला या एकाकीपणाची भीती वाटू लागली. तिने आपल्या सोसायटीत शेजारी राहणाºया लोकांना तसे बोलूनही दाखविले.
या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तिला पूर्व बर्दवान येथील घरी सुखरूपपणे पोहोचते करायचे ठरविले. त्याआधी तिला मानसिक आधार देण्याकरिता या सोसायटीमध्ये राहणाºया एका माजी प्राध्यापिकेने तिच्याशी संवाद साधला. आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत, असा विश्वास तिला दिला. हे करताना सोसायटी पदाधिकाºयांनी पोलिसांशीही संपर्क साधून त्यांच्या कानावर या मुलीची कहाणी घातली होती. आपली आजारी आजी व आईची या विद्यार्थिनीला चिंता लागून राहिली होती. त्यामुळे ती रडवेली झाली. तिला घरी परत जाण्यासाठी पोलिसांनीही मदत करायचे ठरविले. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी तिच्या आईशी संपर्क साधला.