CoronaVirus News: कोरोना मृत्यूंमागचं 'खरं' कारण समोर; ६०% रुग्णांच्या मृत्यूबद्दल धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:48 AM2021-05-28T08:48:36+5:302021-05-28T08:56:47+5:30
CoronaVirus News: संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती; कोरोना रुग्णांवरील उपचार पद्धतीत मोठी त्रुटी?
नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात ३ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमागचं प्रमुख कारण जर्नल इंफेक्शन अँड ड्रग रेसिस्टंसमध्ये प्रकाशित झाला आहे. कोरोना काळात रुग्णांवर एँटीबायोटिक्सचा बेसुमार वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुपरबग तयार होतो. परिणामी बॅक्टेरियल आणि फंगल इंफेक्शन वेगानं वाढतं अशी माहिती संशोधन अहवालातून समोर आली आहे.
ऑक्सिजनची पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ‘ती’ परतली
कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये एँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. सूक्ष्मजीवांना (बॅक्टेरिया) निष्प्रभ करण्यासाठी एँटीबायोटिक्स वापरली जातात. मात्र एँटीबायोटिक्सचा अधिक वापर झाल्यास सूक्ष्मजीव त्यांच्याविरोधात प्रतिरोधक क्षमता विकसित करतात. त्यामुळे एँटीबायोटिक्स औषधांचा परिणाम होत नाही, अशी माहिती जर्नल इंफेक्शन अँड ड्रग रेसिस्टंसनं समोर आणली आहे.
कोरोनावर परिणामकारक कॉकटेल ड्रगचा भारतात वापर; ७० टक्के प्रभावी असल्याचा दावा
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णालयांत भरती झालेल्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शन आढळून आलं होतं. हे इंफेक्शन औषधांना निष्प्रभ करणारे सूक्ष्मजीव पसरवत होते. याबद्दलची माहिती गोळा करण्यासाठी संशोधकांनी देशातील १० रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या १७ हजार ५६३ रुग्णांचा अभ्यास केला. संशोधनानुसार बॅक्टेरिया आणि फंगसनं संक्रमित झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या २८ टक्के होती. सूक्ष्मजीवांनी अँटीबायोटिक्स निष्प्रभ केल्यानं कोरोना रुग्णांना बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शनची लागण झाली होती.
संशोधन अहवालातील माहितीनुसार, कोरोना रुग्णांमध्ये एँटिबायोटिक्समुळे अतिरिक्त संक्रमण झालं. देशातील ६० टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू याच कारणामुळे झाला. त्यामुळे ६० टक्के मृत्यूंना केवळ बॅक्टेरिया आणि फंगसमुळे तयार झालेला सुपरबग कारणीभूत ठरला. या सुपरबगची शिकार न झालेल्यांपैकी केवळ ११ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश जण मधुमेह आणि रक्तदाब या समस्यांचा सामना करत होते.