CoronaVirus News: नव्या कोरोना रुग्णांचा दहा महिन्यांतील नीचांक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 11:43 PM2021-02-07T23:43:31+5:302021-02-07T23:43:51+5:30
बळींच्या संख्येत घट; रविवारी आढळले १२,०५९ नवे रुग्ण
नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे मरण पावणाऱ्या दररोजच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. रविवारी या संसर्गाने बळी गेलेल्यांची संख्या अवघी ७८ होती. ही संख्या १०० पेक्षा कमी असण्याची या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. देशात रविवारी कोरोनाचे १२,०५९ नवे रुग्ण आढळून आले. गेल्यावर्षी १ मेपासून आजवर आढळलेल्या दररोजच्या नव्या कोरोना रुग्णसंख्येचा हा नीचांक आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या १,४८,७६६ असून, त्यांचे प्रमाण १.३७ टक्के आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ५ लाखांपेक्षा अधिक असून, त्याचे प्रमाण ९७.२० टक्के आहे.
देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०८,२६,३६३ असून त्यापैकी १,०५,२२,६०१ जण बरे झाले आहेत. रविवारी कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४३ टक्के होता.
जगामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० कोटी ६३ लाख असून, त्यापैकी ७ कोटी ८० लाख जण बरे झाले, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या २ कोटी ५८ लाख आहे. जगात कोरोनामुळे २३ लाख २१ हजार लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेमध्ये २ कोटी ७५ लाख कोरोनाचे रुग्ण असून त्यापैकी १ कोटी ७२ लाख लोक बरे झाले.
आतापर्यंत ५७ लाख लोकांना दिली कोरोना लस
५७ लाख लोकांना देशामध्ये आतापर्यंत कोरोना लस देण्यात आली आहे. जगामध्ये अमेरिकेमध्ये सर्वाधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली असून, त्यानंतर दुसरा क्रमांक ब्रिटनचा लागतो. या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी आहे.
या सर्वांना लसीकरण मोहिमेच्या १,१५,१७८ सत्रांमध्ये कोरोना लस देण्यात आली. शनिवारी ३,५८,४७३ जणांना कोरोना लस टोचण्यात आली.
१६ जानेवारीला ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे, त्यांना लसीचा दुसरा डोस १३ फेब्रुवारी रोजी दिला जाईल.