CoronaVirus News: देशात ४ जुलैपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात?; भौतिक शास्त्रज्ञाच्या दाव्यानं चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 03:06 PM2021-07-12T15:06:04+5:302021-07-12T15:06:22+5:30
CoronaVirus News: प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञाच्या दाव्यानं चिंतेत भर
हैदराबाद: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसत आहे. मात्र हैदराबादमधील एका प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञानं देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचा दावा केला आहे. गेल्या १५ महिन्यांतील संसर्ग आणि मृत्यूचा दर विचारात घेऊन, त्या आकडेवारीचा विचार करून भौतिक शास्त्रज्ञानं हा दावा केला आहे. याबद्दलचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं आहे.
४ जुलैपासूनचा कोरोना संसर्गाचा दर आणि मृत्यूदर हा फेब्रुवारीतल्या आकडेवारीसारखाच आहे. ४ जुलैपासूनची आकडेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील आकडेवारी यात बरंच साम्य आहे, अशी माहिती डॉ. विपिन श्रीवास्तव यांनी दिली. हैदराबाद विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू असलेले श्रीवास्तव प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि त्या लाटेनं एप्रिलच्या अखेरीस टोक गाठलं याकडे श्रीवास्तव यांनी लक्ष वेधलं.
लोकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास, मास्कचा वापर न केल्यास, लसीकरणाकडे पाठ फिरवल्यास तिसऱ्या लाटेचा धोका वाढेल असा सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला. कोरोनाच्या लाटांचा पॅटर्न पाहण्यासाठी त्यांनी गेल्या ४६१ दिवसांमधील कोरोना संसर्ग दराचा आणि मृत्यूदराचा अभ्यास केला आहे. ४ जुलैपासूनच्या आकडेवारीचं श्रीवास्तव दर २४ तासांनी विश्लेषण करत आहेत. ४ जुलैपासूनची आकडेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील आकडेवारी यात बरंचसं साम्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.