CoronaVirus News: लस घेऊ इच्छिणाऱ्यांनो, अॅपवर द्या वयाचा पुरावा; आधार अथवा मतदारपत्राचा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:16 AM2021-02-26T00:16:32+5:302021-02-26T06:57:03+5:30
आधार अथवा मतदारपत्राचा क्रमांक
नवी दिल्ली : देशातील ६० वर्षांवरील सर्वांना व व्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील लोकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. मात्र लस घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रथम ‘को-विन’ अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून नावाची नोंदणी करावी लागेल.
या वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी देशात ३० हजार केंद्रे आहेत. त्यापैकी १० हजार सरकारी केंद्रांत मोफत लस दिली जाणार आहे.
खासगी केंद्रे व रुग्णालयांत या लसीसाठी ठरावीक शुल्क आकारले जाईल. नावनोंदणी करणाऱ्याला आपले आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक तसेच वयाचा पुरावा ही माहिती भरावी लागेल. ही सर्व माहिती योग्य असल्यास त्या इच्छुकाचे नाव लसीकरणासाठी को-विन अॅपमध्ये नोंदविले जाईल.
लस घेऊ इच्छिणाऱ्याच्या वयाबद्दल काही शंका असेल तर जिल्हाधिकारी त्या गोष्टीची खातरजमा आपल्या कर्मचाऱ्यांकडून करून घेतील. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात गेल्या २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची सर्वाधिक नोंद करण्यात आली असून, तब्बल १६ हजार ७३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारच्या तुलनेत साडेचार हजार रुग्णांची वाढ झाली आहे. शिवाय गेल्या २४ तासांत सर्वाधिक १३८ रुग्णांचा मृत्यू झाला.