CoronaVirus News : बारावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्याबाबत आज निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:38 AM2020-06-24T03:38:17+5:302020-06-24T03:38:24+5:30
बारावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरील चर्चा अंतिम टप्प्यात असून बुधवारी यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने एक ते पंधरा जुलैदरम्यान होणारी बारावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरील चर्चा अंतिम टप्प्यात असून बुधवारी यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे केंद्र सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
न्या. ए. एम. खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि संजीव खन्ना यांच्या न्यायपीठाला माहिती देताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, सरकार आणि सीबीएसईला विद्यार्थ्यांच्या चिंतेची जाणीव आहे. या मुद्यावर अधिकारी लवकरच निर्णय घेतील. त्यांनी या प्रकरणाची सुनावणी एक दिवसासाठी तहकूब करण्याची विनंती करताना सांगितले की, अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाला कळविला जाईल. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी २५ जूनपर्यंत स्थगित केली.
काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत आहे. याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, सीबीएसईला आधी घेतलेल्या परीक्षेच्या आधारे निकाल घोषित करण्यास आणि उर्वरित विषयांच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार गुणांच्या सरासरीच्या आधारावर गुण निश्चित करण्याचे निर्देश दिले जावेत. बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा घोषित करणारी सीबीएसईची १८ मे रोजीची अधिसूचना रद्द करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारीही सर्वोच्च न्यायालयात अन्य एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
यात भारतीय शालेय प्रमाणपत्र परिषदेने (आयसीएसई) कोविड-१९ साथीदरम्यान घेतलेली परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. आयसीएसईच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, सीबीएसई परीक्षेसंदर्भात सरकारच्या निर्णयाचे पालन केले जाईल. तथापि, कोर्टाने म्हटले की, आयसीएसई या मुद्यांवर स्वत: निर्णय घेऊ शकते.
मेहता यांनी यावेळी सांगितले की, सीबीएसई परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय आयसीएसईला बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी २५ जून रोजी ठेवली आहे.