CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० लाखांवर; १३ दिवसांत १० लाख नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 12:33 AM2020-09-06T00:33:11+5:302020-09-06T07:22:48+5:30
बळींचा आकडा ६९,५६१
नवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी कोरोनाचे ८६,४३२ नवे रुग्ण आढळून आले असून हा आजवरचा उच्चांक आहे. आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४०,२३,१७९ झाली आहे. कोरोना रुग्णांची ३० लाख संख्या अवघ्या १३ दिवसांत ४० लाखांवर पोहोचली आहे, तर या आजारातून ३१ लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत.
कोरोना आजारातून बरे झालेल्यांचे प्रमाण ७७.२३ टक्के असून अशा व्यक्तींची एकूण संख्या ३१,०७,२२३ आहे. या आजारामुळे आणखी १,०८९ जण मरण पावले असून त्यामुळे बळींची एकूण संख्या ६९,५६१ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७३ टक्के इतका कमी राखण्यात यश आले आहे.
देशभरात सध्या ८,४६,३९५ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची संख्या एकूण रुग्णांच्या २१.०४ टक्के इतकी आहे. या संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही दिलासादायक गोष्ट असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
४ कोटी ७७ लाखांवर चाचण्या
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,७७,३८,४९१ झाली आहे. देशात दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्याचे लक्ष्य आयसीएमआरने ठेवले आहे.
च्कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,६८७, कर्नाटकात ६,१७०, दिल्लीमध्ये ४,५१३, आंध्र प्रदेशात ४,२७६, उत्तर प्रदेशमध्ये ३,७६२, पश्चिम बंगालमध्ये ३,४५२, गुजरातला ३,०७६, पंजाबमध्ये १,७३९ इतकी आहे.
कोरोना रुग्णांची १० लाख संख्या २० लाख होण्यास २१ दिवस लागले. त्यापुढच्या १६ दिवसांत रुग्णसंख्या ३० लाखांवर गेली. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांतच हा आकडा ४० लाखांहून अधिक झाला. कोरोना साथीच्या प्रारंभी रुग्णांची संख्या १ लाख व्हायला ११० दिवस व १० लाख रुग्ण होण्यासाठी ५९ दिवस लागले होते.