CoronaVirus News: देशातील एकूण रुग्णांची संख्या १२ लाखांच्या जवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 11:27 PM2020-07-22T23:27:17+5:302020-07-22T23:27:36+5:30
कोरोनामुळे आणखी ६४८ जण मरण पावले. त्यामुळे एकूण बळींची संख्या २८,७३७ इतकी झाली आहे.
नवी दिल्ली : देशभरात बुधवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३७,७२४ नवे रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे या रुग्णांची एकूण संख्या आता १२ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. याच दिवशी २८,४७२ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ७ लाख ५३ हजारांवर पोहोचली आहे.
बुधवारी कोरोनामुळे आणखी ६४८ जण मरण पावले. त्यामुळे एकूण बळींची संख्या २८,७३७ इतकी झाली आहे. सध्या देशात ४,११,१३३ जणांवर उपचार सुरू असून, पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ७,५३,०४९ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी ६३.१३ टक्के लोक बरे झाले आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या ३,४१,९१६ने जास्त आहे.
सलग सात दिवस दररोज ३० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी मरण पावलेल्या ६४८ मध्ये महाराष्ट्रातील २४६ जणांचा समावेश आहे. एकूण मृतांत उत्तर प्रदेशमधील १,२२९, पश्चिम बंगालमधील १,१८२, आंध्र प्रदेशमधील ७५८, मध्य प्रदेशमधील ७५६ मृतांचा समावेश आहे. ७० टक्के लोकांना एकाहून अधिक व्याधींचा त्रास होता, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले.