CoronaVirus News: महाराष्ट्रात ११.५० लाख लोकांचे लसीकरण; देशात आतापर्यंत २१ कोटी तपासण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 01:04 AM2021-02-27T01:04:27+5:302021-02-27T07:02:20+5:30
देशात १६ हजारांवर, तर महाराष्ट्रात ८ हजार ७०२ नवे रुग्ण; देशात आतापर्यंत २१ कोटी तपासण्या
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ११ लाख ४२ हजार २९० आरोग्य सेवकांना लस देण्यात आली असून यात दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ३१ हजार ९६८ व्यक्तींचा समावेश आहे.
देशातील १ कोटी ३० लाख ६७ हजार ४७ आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे. यातील ३ लाख ९५ हजार ८८४ व्यक्तींना गुरुवारी लस दिली गेली. लसीकरणात उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्र आघाडीवर आहे. उत्तरप्रदेशात आतापर्यंत १३ लाख ७० हजार ७३९ लस देण्यात आली. यातील ११ लाख ६७ हजार २८५ आरोग्यसेवकांना पहिल्या तर दुसऱ्या टप्प्यात २ लाख ३ हजार ४५४ जणांचे लसीकरण झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक ८ हजार ७०२ रुग्ण आढळले.
केरळमध्ये ३,६७७, तामिळनाडू ४६७, कर्नाटक ४५३ तसेच गुजरातमध्ये ४२४ रुग्णांची भर पडली. गुरुवारी महाराष्ट्रातील ५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. केरळमध्ये १४, पंजाब १३, छत्तीसगढ ८ तसेच कर्नाटकमध्ये ७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात आतापर्यंत २१ कोटी ४६ लाख ६१ हजार ४६५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ८ लाख ३१ हजार ८०७ तपासण्या गुरुवारी झाल्या.
जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
जगातील ६०पेक्षा अधिक देशांना भारताने कोरोना लसींचा पुरवठा केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले आहे. जगातील अन्य देश भारताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे अनुकरण करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
लसीकरणात ही राज्ये मागे
छत्तीसगढ ३५.६५%
नागालँड ३५.११%
तेलंगणा ३५.०३%
मिझोरम ३४.७३%
पंजाब ३३.५८%
गोवा ३३.३६%
अरुणाचल २६.५०%
तामिळनाडू २५.१६%
मणिपूर २३.७६%
आसाम २३.३४%
अंदमान २२.८९%
मेघालय २१.०४%
पद्दुचेरीत ६.८१%
उपचाराधीन रुग्णांमध्ये वाढ
देशामध्ये सलग दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी कोरोनाचे १६ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १० लाख ६३ हजार झाली. पैकी १ कोटी ७ लाख ५० हजार लोक बरे झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांत वाढ झाली असून, त्यांची संख्या १ लाख ५५ हजार व प्रमाण १.४१ टक्के झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
जगातील ६०पेक्षा अधिक देशांना भारताने कोरोना लसींचा पुरवठा केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले आहे. जगातील अन्य देश भारताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे अनुकरण करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेत पाच कोटी लोकांना दिली लस
अमेरिकेमध्ये आतापर्यंत पाच कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सत्तासूत्रे स्वीकारली त्याला १०० दिवस जेव्हा पूर्ण होतील तोवर १० कोटी लोकांना लस देण्याचा निर्धार या देशाने केला आहे. बायडेन यांनी म्हटले आहे की, लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क घालावा व सतत हात धूत राहावे. लस घेण्याबरोबरच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हे तीन उपायही तितकेच महत्त्वाचे आहेत.