CoronaVirus News : सहा महिन्यांमध्ये ३० काेटी लाेकांचे लसीकरण शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 01:35 AM2020-12-20T01:35:10+5:302020-12-20T01:35:27+5:30
CoronaVirus News: काेविड १९ संदर्भात मंत्रिगटाची बैठक झाली. त्यात लसीकरणाचा आढावा घेतला.
नवी दिल्ली : काेविड १९ विषाणूची लस मंजुरीच्या उंबरठ्यावर असून, पुढील ६ ते ८ महिन्यांमध्ये देशातील ३० काेटी जनतेचे लसीकरण शक्य हाेईल, अशी तयारी भारताने केल्याची माहिती केंद्रीय आराेग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी दिली. काेविड १९ संदर्भात मंत्रिगटाची बैठक झाली. त्यात लसीकरणाचा आढावा घेतला.
लसीकरणाबाबत सर्व सैन्यदलांना यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे. सैन्यदलातील सर्व आराेग्य कर्मचारी तसेच काेविड फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची माहिती गाेळा केली असून, या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार असल्याची माहिती डाॅ. हर्षवर्धन यांनी दिली. नीती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी लसीबाबत १२ देशांनी केलेल्या विनंतीबाबत माहिती दिली. तसेच आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीची माहिती दिली. देशाचा रिकव्हरी रेट ९५.४६ टक्के झाला असून, मृत्यूदर १.४५ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.
रेल्वेने गमावले ७०० कर्मचारी
काेराेना महामारीच्या काळात रेल्वेच्या ३० हजार कर्मचाऱ्यांना काेविड १९ विषाणूचा संसर्ग झाला असून, त्यापैकी ७०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे. महामारीच्या काळात रेल्वे सुरू ठेवण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.