CoronaVirus News : WHO च्या प्रमुखांकडून भारताचे कौतुक; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 08:49 AM2020-11-12T08:49:34+5:302020-11-12T09:18:00+5:30
CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी आयुष्मान भारत आणि क्षयरोग (टीबी) विरूद्ध मोहिमेसारख्या देशांतर्गत उपक्रमांचे कौतुक केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टी.ए. गेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांच्यात कोरोनावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भागीदारीबाबत बुधवारी चर्चा केली. यावेळी आधुनिक वैद्यकीय पद्धतीसोबत पारंपारिक औषधांचा समावेश करण्याबाबत बातचीत झाल्याचे समजते.
पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांशी फोनवर चर्चा केली आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी जागतिक भागीदारीत समन्वय साधण्याच्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले. या चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी कोरोनावर मात करताना अन्य रोगांविरूद्धच्या लढाईत सुद्धा लक्ष विचलित होऊ नये, यावरही भर दिला. विकसनशील देशांमध्ये आरोग्य यंत्रणेला संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्वही त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी संघटना आणि भारतीय आरोग्य प्राधिकरण यांच्यातील जवळच्या आणि नियमित भागीदारीवर जोर दिला आणि आयुष्मान भारत आणि क्षयरोग (टीबी) विरूद्ध मोहिमेसारख्या देशांतर्गत उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले की, जागतिक आरोग्याच्या संदर्भात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
I thanked Prime Minister @narendramodi for his strong commitment to COVAX and making #COVID19 vaccines a global public good. The pandemic is an unprecedented challenge for the world, and we agreed to work shoulder to shoulder to end it. #ACTtogether
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 11, 2020
याचबरोबर, निवेदनात म्हटले आहे की पारंपरिक औषध प्रणालीविषयी पंतप्रधान आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख यांच्यात सकारात्मक चर्चा झाली, विशेषत: जगभरातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चर्चेदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना सांगितले की, १३ नोव्हेंबर रोजी 'कोव्हिड-१९ साठी आयुर्वेद' या थीमवर आधारित देशात आयुर्वेद दिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान, या चर्चेनंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विविध गोष्टी आणि प्रयत्नांसाठी आभार मानले.