CoronaVirus News: भारतात लसीचा पहिला डोस कुणाला?; आरोग्य मंत्रालयाकडून गुप्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:39 AM2021-01-01T00:39:05+5:302021-01-01T07:00:32+5:30
आरोग्य मंत्रालयाकडून गुप्तता; अन्य राष्ट्रप्रमुखांचेही उदाहरण
नवी दिल्ली : इग्लंडमध्ये कोरोना लसीला मान्यता मिळाल्यानंतर भारतात आक्स्फर्डची लस विकसित करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. लसीकरणास परवानगी देताना अमेरिकेचे नव-अध्यक्ष जो बायडन, रशियाचे अध्यक्ष वाल्दिमीर पुतीन व इग्लंडचे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांनीदेखील लस टोचून घेतली. भारतात मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीचा पहिला डोस देण्यावर सरकारमध्ये अद्याप चर्चा नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयात यावर गुप्तता पाळली जात आहे.
राष्ट्रपती व पंतप्रधानांनंतर केंद्रीय मंत्र्यांनादेखील लस देण्यासंबंधी चर्चा नाही. आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अद्याप लसीला मंजुरी देण्यात आलेली नाही. मंजुरी दिल्यानंतर पहिल्यांदा लस कोणाला टोचावी यावर विचार करता येईल. प्रातिनिधिक स्वरूपात लस कुणाला द्यावी, यावर तूर्त चर्चा नाही. आवश्यक सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच लसीला परवानगी देण्यात येईल.
केंद्रीय मंत्रिमंडळातील मराठी मंत्र्यांच्या कार्यालयांकडून लसीसंदर्भात माहिती देण्यास नकार देण्यात आला. केंद्रीय मंत्री डाॅ. हर्षवर्धन, राज्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे पाटील यांच्या कार्यालयाने यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नववर्षाच्या सुरूवातीलाच भारतात कोरोना लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
लसीकरणाच्या खोट्या जाहिरातींना रोखा -याचिका दाखल
कोरोनाला रोखण्याच्या खोट्या, बनावट जाहिराती, संकेतस्थळ, व्हाॅट्सएप मेसेजमुळे सरकारची चिंता वाढली आहे. यामुळे सामान्य लोकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक होण्याची भीती आहे. अशा मेसेज, संकेतस्थळांवर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
९८.६० लाख झाले कोरोनामुक्त
देशात ९८.६० लाख लोक कोरोनामुक्त झाले असून त्यांचे प्रमाण ९६ टक्क्यांहून अधिक आहे. सलग दहाव्या दिवशीही सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांपेक्षा कमी होती. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.