CoronaVirus News : सुरतमध्ये सरकारी रुग्णालयात यज्ञ, अंत्यसंस्कारासाठी रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 05:55 AM2021-04-15T05:55:08+5:302021-04-15T07:27:11+5:30
CoronaVirus News: देशभरात गेल्या २४ तासांत एक लाख ८४ हजार ३७२ कोरोनाचे नवे रुग्ण नोंद झाले. सरकारी रुग्णालयात कोरोनापासून संरक्षणासाठी यज्ञाचे आयोजन आर्य समाजाने केले होते.
सुरत (गुजरात) : देशात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत चालली असताना, त्यावर उपाय म्हणून लसीकरण, कडक निर्बंध, लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी असे उपाय योजले जात आहेत. मात्र, गुजरातच्या सुरत शहरात सरकारी रुग्णालयात कोरोनाला रोखण्यासाठी यज्ञ करण्यात आला होता. मात्र, गुजरातमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून, मृताच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना वाट पाहावी लागत असल्याचा विरोधाभास समोर आला आहे.
देशभरात गेल्या २४ तासांत एक लाख ८४ हजार ३७२ कोरोनाचे नवे रुग्ण नोंद झाले. सरकारी रुग्णालयात कोरोनापासून संरक्षणासाठी यज्ञाचे आयोजन आर्य समाजाने केले होते. रुग्णालयाच्या व्यवस्थापनानेच यज्ञ करण्यास सांगितले होते, अशी माहिती आर्य समाजातील एका सदस्याने दिली. आर्य समाजाचे अध्यक्ष उमाशंकर आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ घेला आणि कुरुक्षेत्र स्मशानभूमीत यज्ञ आयोजित केला गेला होता. सुरतमधील सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनीच आम्हाला यज्ञाचे आयोजन करण्यास सांगितले होते, असे आर्य म्हणाले.
दरम्यान, गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत ६ हजार ६९० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
अंत्यसंस्कारासाठी रांग
गुजरातमधील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, प्रत्येक तासाला ३ जणांचा मृत्यू होत असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णांसाठी खाटा, प्राणवायूची मोठी टंचाई असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठीची व्यवस्थाही अपुरी पडत असल्याचे सांगितले जात आहे.