Coronavirus : वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्यांचे कामकाज विनाअडथळा सुरू राहिले पाहिजे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:54 AM2020-03-25T01:54:57+5:302020-03-25T05:30:02+5:30
coronavirus : २३ मार्च रोजी मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘वृत्तसंस्था आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांसारखे भक्कम माहिती प्रसारित करणारे नेटवर्क्स हे खरी, विश्वसनीय माहिती वेळेवर पोहोचेल यासाठी फारच महत्त्वाचे आहे.’’
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्याच्या परिस्थितीत वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कामकाज विनाअडथळा सुरू राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन माहिती आणि प्रसारण (आय अँड बी) मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले आहे.
२३ मार्च रोजी मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘वृत्तसंस्था आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांसारखे भक्कम माहिती प्रसारित करणारे नेटवर्क्स हे खरी, विश्वसनीय माहिती वेळेवर पोहोचेल यासाठी फारच महत्त्वाचे आहे.’’ जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीच माहितीचे हे जाळे योग्यरीत्या काम करणे आवश्यक आहे, असे नाही तर संपूर्ण देशाला ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठीही गरजेचे आहे. खोट्या आणि बनावट बातम्या टाळणे आवश्यक आहे.
राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाने या सेवा सुरळीत सुरू राहतील याची खात्री करावी. दूरचित्रवाणी वाहिन्या (टीव्ही चॅनल्स), वृत्तसंस्था, टेलिपोर्ट आॅपरेटर्स, डिजिटल सॅटेलाईट न्यूज गॅदरिंग, डीटीएच (डायरेक्ट टू होम) आणि हायएंड-इन-द-स्काय, मल्टी सिस्टीम आॅपरेटर्स, केबल आॅपरेटर्स, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन (एफएम) रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स आदींचा यात समावेश आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचा विचार असल्यास वरील सेवा, संस्थांची साखळी कोणताही अडथळा न येता सुरू राहण्यास परवानगी असली पाहिजे, असे पत्रात म्हटले आहे. प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी वाहनांच्या हालचाली, त्यांना गरज भासल्यास इंधनाची व्यवस्था करावी, विनाअडथळा वीजपुरवठा व इतर अनुषंगिक आवश्यक गोष्टी त्या त्या संस्थांनी मागितल्यास द्याव्यात, असेही त्यात म्हटले.
वृत्तपत्रांवर विश्वास ठेवा
कोरोना विषाणूबद्दल आम्हाला सगळे काही माहिती नसल्यामुळे चुकीची माहिती मोठ्या प्रमाणावर पसरते. त्यातील काही लोकांच्या मनात खोलवर जाऊन बसते. वृत्तपत्रे मात्र अशा घातक विषाणूचा फैलाव करीत नाहीत याची याद्वारे खात्री दिली जात आहे. जागतिक आरोग्य संघटना, सीडीसी, अनेक नामवंत डॉक्टर्स आणि आघाडीच्या अतिसूक्ष्म विषाणूतज्ज्ञांनीही वृत्तपत्रांवरील हा आरोप खोडून काढला आहे. एवढेच काय केंद्र आणि राज्य सरकारांनीही वृत्तपत्रांना अत्यावश्यक सेवेत ठेवले आहे.