Coronavirus : राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार टोलवसुली; केंद्रानं दिली मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 10:35 AM2020-04-18T10:35:02+5:302020-04-18T10:36:14+5:30
केंद्र सरकारने २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
नवी दिल्लीः कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता मोदी सरकारनं २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. तोच लॉकडाऊन आता ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचदरम्यान मोदी सरकारनं एक नियमावली बनवली असून, काही गोष्टींना सूट दिली आहे. राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून टोलवसुली करण्यासही केंद्रातील मोदी सरकारनं मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
गृह मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, टोलवसुली संग्रह सरकारी तिजोरीला हातभार लावतो आणि अर्थसंकल्पीय पाठबळासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास आर्थिक मजबुती देतो. आंतरराज्य व बाह्य राज्यात सर्व ट्रक व इतर वस्तू किंवा वाहनांसाठी गृह मंत्रालयाने दिलेली शिथीलता लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आवश्यक ती कारवाई करावी. त्यादृष्टीने २० एप्रिल २०२० पासून टोलवसुली पुन्हा सुरू केली जाणार आहे.
दरम्यान, अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने केंद्र सरकारला टोलवसुली पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी)चे अध्यक्ष कुलतरणसिंग अटवाल यांनी याचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, या क्षेत्रावर कोणताही आर्थिक भार टाकण्यापूर्वी सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. लॉकडाऊनमुळे आधीच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे.