CoronaVirus : दिल्लीतील मरकज केलं खाली, तेलंगणा- तामिळनाडूमध्ये १२०० लोक 'क्वारंटाइन'!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 09:04 AM2020-03-31T09:04:30+5:302020-03-31T09:10:42+5:30

CoronaVirus : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात मरकजमध्ये जवळपास १४०० लोक राहिले होते

CoronaVirus: nizamuddin tabligi jamaat markaz corona positive cases telangana, tamilnadu rkp | CoronaVirus : दिल्लीतील मरकज केलं खाली, तेलंगणा- तामिळनाडूमध्ये १२०० लोक 'क्वारंटाइन'!

CoronaVirus : दिल्लीतील मरकज केलं खाली, तेलंगणा- तामिळनाडूमध्ये १२०० लोक 'क्वारंटाइन'!

googlenewsNext

नवी दिल्ली  : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात मरकजचे कोरोना कनेक्शन समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या मरकजमध्ये आलेल्या संशियात व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच, निजामुद्दीनमधील मरकजमधून तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या लोकांची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. तेलंगणामध्ये १९४ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर तामिळनाडूमध्ये ९८१ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम सुरु आहे.  

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात मरकजमध्ये जवळपास १४०० लोक राहिले होते. ज्यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश होता. विदेशींमध्ये जास्तकरून मलेशिया आणि इंडिनेशियाचे नागरिक आहेत. दिल्लीत येण्याआधी हा ग्रुप २७ फेब्रुवारी ते १ मार्चच्या दरम्यान मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमधील एका धार्मिक कार्यक्रमात सामील झाला होता. यामधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनला समजल्यानंर एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस, मेडिकल आणि WHO ची टीम तात्काळ दाखल झाली आहे. रात्री उशिरापर्यंत मरकज खाली करण्याचे काम सुरु होते. तर मरकजमध्ये असणाऱ्या १४०० मधील ११ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या ११ मधील १० लोक इंडोनिशियाचे आहेत. तसेच, याठिकाणी एका ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर येथील ३४ जणांचे सॅम्पल तपासणीसाठी LNJP हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयातील १८ जणांना हैदराबादमध्ये क्वारंटाइन केले आहे.

दिल्लीत रात्री उशिरा मरकजमधून जवळपास १०० हून अधिक संशयित लोकांना तीन बसेस मधून घेऊन जाण्यात येत होते. मात्र, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पोलिसांनी या लोकांना मरकजमधून बाहेर काढले आणि ज्यांना आजार आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर संशयितांना नरेला येथील आयसोलेशनमध्ये पाठविले आहे. याप्रकरणी मरकजच्या मौलानाविरोधात दिल्ली सरकारने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोनावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. देशात कोरोनाचे  १०७१ रुग्ण असून, २९ जणांचा मृत्यू झाला आहे. 
 

Web Title: CoronaVirus: nizamuddin tabligi jamaat markaz corona positive cases telangana, tamilnadu rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.