CoronaVirus News: आर्सेनिक औषधावर नाही कोणाचेच नियंत्रण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:06 AM2020-06-18T04:06:32+5:302020-06-18T06:55:39+5:30
वितरकांकडून थेट खरेदी; अन्न आणि औषध प्रशासनाची भूमिका काय?
पुणे : केंद्रीय आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ हे औषध कोरोनाच्या साथीत उपयुक्त असल्याचे सांगितल्यानंतर मागणी झपाट्याने वाढली. मात्र, औषध तयार करण्याची पद्धत, बाटल्यांवरील बॅच नंबर, दर्जा याबाबत कोणतेही नियम पाळले जातात का, अन्न आणि औषध प्रशासनाचे या उत्पादनावर काही नियंत्रण आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वाटप करणाऱ्या संस्था-व्यक्तींनी थेट वितरकांकडून दुप्पट किमतीने खरेदी केल्याची चर्चाही पुढे आली आहे. अर्सेनिक गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर सुरुवातीला औषध विक्रेत्यांकडे औषध उपलब्ध होते. मात्र, रुग्णांनी विचारणा करूनही होमिओपथिक डॉक्टरांकडे औषधाचा तुटवडा होता. होमिओपॅथिक औषध तयार करण्याचे स्वरूप ठरलेले असते. औषधाच्या उत्पादनाची तारीख, बॅच नंबर, घटक पदार्थ ही सर्व माहिती बाटलीवर लिहिणे बंधनकारक असते. होमिओपॅथिक डॉक्टर रुग्णांच्या समोर औषध तयार करून देतात. औषधे आधीच तयार करून ठेवल्यास विश्वासार्हता कमी होते. १ किंवा २ ग्रॅम बाटलीतील गोळ्यांमध्ये २० थेंब द्रवपदार्थ मिसळला जातो. मोफत वाटप होणाऱ्या औषधांच्या बाबतीत हे निकष पाळले गेले का, याची खातरजमा केली जात नसल्याचे होमिओपॅथिक तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले.
उत्पादन महाराष्ट्रात नाही
आर्सेनिक औषधाची मागणी कोरोना संक्रमणाच्या काळात जवळपास ७० टक्क्यांनी वाढली. मागणी वाढल्यानंतर कंपन्यांकडून उत्पादन वाढवण्यात आले. होमिओपॅथिक औषधांचे उत्पादन करणाºया कंपन्या महाराष्ट्रात नाहीत. दिल्ली, पंजाब, हरियाणा येथे हे उत्पादन प्रकल्प आहेत.
- डॉ. प्रशांत आहेर, होमिओपॅथी डॉक्टर
भेसळ शक्य नाही
डॉक्टर एरवी ३० ‘एमएल’ औषध घेत असतील तर आता त्यांनी १-२ लिटर मागणी सुरु केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात औषध उपलब्ध करून देणे शक्य नव्हते. त्यामुळे काही काळाने फार्मसी आणि डॉक्टर दोघांकडे तुटवडा निर्माण झाला. आर्सेनिक लिक्विड उपलब्ध होत होते मात्र, गोळ्या नव्हत्या. कारण, गोळ्यांचे उत्पादन करणारी एकही कंपनी महाराष्ट्रात नाही. होलसेल व्यापारी किंवा औषध विक्रेत्यांशी संपर्क न साधता थेट कंपन्या किंवा वितरकांशी संपर्क साधून अनेकांनी ते मिळवले. गोळ्यांची किंमत एक रुपये असेल तर त्या दुप्पट-तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या. त्यामुळे वितरकांनीही थेट त्यांना पुरवठा करण्यास पसंती दिली. होमिओपथिक औषधे स्वस्तात उपलब्ध असल्याने त्यात भेसळ करणे परवडणारे नाही.
- प्रीतम दर्डा, घाऊक औषध विक्रेते
औषध कोठून उपलब्ध झाले, त्याचे बिल, कागदपत्रे, औषध कधी आणि कुठे तयार केले, गोळ्या कशा प्रमाणात दिल्या गेल्या या सर्व गोष्टीची नोंद असणे गरजेचे आहे. याबाबत डॉ. अमोल मचाले यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना उद्देशून ट्विट केले होते. अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सुचवण्यात आले होते. आर्सेनिकमुळे कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्याची वैद्यकीय चाचणी झालेली नाही. मात्र, ‘आयुष’ने प्रोत्साहन दिल्यानंतर मात्र त्यावर अक्षरश: उड्या पडल्या.